
नागपूर– नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली असून, भाजपाचे स्टार प्रचारक, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते व खासदार मनोज तिवारी तसेच माजी गृह राज्यमंत्री व भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या उपस्थितीत शहरात झालेल्या जाहीर सभांनी राजकीय वातावरण तापवले.
“महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्याचाच महापौर होईल,” असे ठाम प्रतिपादन करत खासदार मनोज तिवारी यांनी “भाजपाच्या संगे चले नागपूर नगरिया” असा नारा दिला. आपल्या लोकप्रसिद्ध गीतांमधून आणि आक्रमक शैलीतील भाषणातून त्यांनी नागपूरकरांना भाजपाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत शहरात एकूण तीन भव्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. सभांची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता उत्थान नगर येथील पहिल्या सभेने झाली. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुरेंद्र गड येथे दुसरी सभा पार पडली, तर रात्री ९ वाजता काशीनगर येथील सभेने या प्रचार दौर्याची सांगता झाली. तिन्ही सभांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या सभांमध्ये भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरात गेल्या २० वर्षांत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. मनोज तिवारी यांच्या या दौऱ्यामुळे उमेदवारांसह पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र दिसून आले.
सभांना संबोधित करताना मनोज तिवारी म्हणाले, “मी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो आहे, तिथे किमान ८५ टक्के उमेदवार निवडून आले आहेत. मात्र नागपूरमधील जनसागर आणि उत्साह पाहता येथे १०० टक्के निकाल भाजपच्याच बाजूने लागेल, याची मला खात्री पटली आहे.”
यावेळी त्यांनी “काठी अन् घोंगड घेऊ द्या की रं, मला बी जत्रेला येऊ द्या की रं” हे मराठी गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच “यूपी के भैया है जी, नागपूर के आभारी है जी” हे गीत गात नागपूरकरांशी आपले जिव्हाळ्याचे नातेही व्यक्त केले.
या सर्व सभांना भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर संबंधित प्रभागांतील उमेदवार आणि मंडळ अध्यक्षही उपस्थित होते. यावेळी दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.
मनोज तिवारी यांच्या उपस्थितीमुळे विशेषतः युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाले. गाणी, संवाद आणि विकासाचा संकल्प यामुळे या तिन्ही सभा अत्यंत यशस्वी ठरल्याचे चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळाले.








