Published On : Thu, Sep 19th, 2019

फक्त मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतात – खासदार सुनिल तटकरे

Advertisement

कर्जत: या सरकारला कसलेच गांभीर्य नाही केवळ कॅबिनेट मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतात, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली.

आज शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्प्याला कर्जत येथून सुरूवात झाली.या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी सभेत केले.कर्जत येथील विकासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने कायम प्रामाणिकपणे कामे केली आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.कर्जत-खोपोली रेल्वे दुहेरी ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे कामे पूर्ण व्हावीत म्हणून कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागत आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

*उद्योग व पर्यावरण ही दोन्ही खाती असताना बेरोजगार मुक्त महाराष्ट्र का करण्यात आला नाही ;आदित्यजी नेमकं कुणाला मुक्त करायचं होतं – अमोल कोल्हे.आदित्य ठाकरेंना बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे मग मागील पाच वर्ष उद्योगखातं शिवसेनेकडं होतं शिवाय पर्यावरण मुक्तीसाठीदेखील पर्यावरण खातं होतं मग नेमकं कोणाला मुक्त करायचं आहे असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांना लगावला.

शिवस्वराज्य यात्रेची सांगता कोकणात होत असून पहिली सभा कर्जत येथे पार पडली. या सभेला जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळाला.शिवसेनेने पाच वर्षात राज्याच्या जनतेसाठी केलेली ठळक पंधरा कामे सांगा असे आव्हानही डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.आज यात्रेतून केवळ मला मुख्यमंत्री करा यासाठी मागणी केली जाते तेव्हा ती जनतेची यात्रा राहत नाही तर ती स्वार्थाची जत्रा असते. यापेक्षा रयतेचं मन राखणारी आणि रयतेचं राज्य आणणारी शिवस्वराज्य यात्रा आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.

या सत्ताधाऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारता पंतप्रधान भारत माता की जय चा नारा देतात आणि मग जनता विचारलेला प्रश्न विसरुन जाते. कर्जाचा डोंगर तसाच राहिला. एवढं या जनतेला गृहित धरण्याचे काम या सरकारकडून होतं असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

जेव्हा चांगलं काम होतं तेव्हा भाजपावाले म्हणतात भाजपा सरकार. वाईट काम झाल कि शिवसेनावाले सांगतात भाजपा सरकार. आणि जेव्हा फायदयाची वेळ येते तेव्हा घाईघाईने सांगतात आमचे युती सरकार असं वेडं बनवण्याचे काम पाच वर्ष करत आहे असा आरोपही केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी राज्यातील नाणार प्रकल्पावर होणाऱ्या विरोधावर भाष्य केले. तसेच मुंबईतील आरे वृक्षतोडीबाबत आदित्य ठाकरे विरोध करतात पण मुख्यमंत्री प्रकल्प होणार, असा दावा करतात. राज्यात फडणवीस सरकार आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही प्रकल्पासंदर्भात विरोधाभास दिसतो, त्यामुळे राज्यात चाललंय तरी काय, असा प्रश्न अमोल मेटकरी यांनी उपस्थित केला.

या सरकारकडे बोलायला विकासाचे मुद्दे नाहीत. शेतकरी आत्महत्येचा आकडा १६ हजारांवर पोहचला आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी काय केलं? एरवी स्वाभिमानाची भाषा शिवसेना करते. पण आज राज्यात सर्वात लाचार पक्ष म्हणून शिवसेना पक्षाची चर्चा होतेय. एक काळ असा होता की बाळासाहेबांनी मुंबईत आवाज केला तर त्याचे परिणाम दिल्लीत व्हायचे. पण आता गुजरातमध्ये जाऊन जय गुजरात बोलावं लागतंय, हे दुर्दैव आहे, अशी जहरी टीकाही अमोल मेटकरी यांनी केली. शिवाय राज्यात धर्म जातीवरून राजकारण होत आहे. मुस्लिम बांधवांना शत्रू म्हटलं जात आहे अशी परिस्थिती फडणवीस सरकारने निर्माण केली असल्याची खंत अमोल मेटकरी यांनी व्यक्त केली.

सभेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुरेश लाड यांनीही आपले विचार मांडले.

सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनिल तटकरे,खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सुरेश लाड, आमदार अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.