Published On : Wed, Jul 15th, 2020

स्वयम् संस्थेतर्फे पोलीस महाभरतीसाठी युवक-युवतींना ऑनलाईन मार्गदर्शन

Advertisement

– विषयतज्ज्ञांकडून मिळणार लेखी परीक्षेच्या अचूक टिप्स

नागपूर : राज्यात आगामी काळात १० हजार पोलीस शिपाई पदांची महाभरती होणार आहे. या भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबकडून युवक-युवतींना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या सर्व घटकांच्या विषयतज्ज्ञांकडून व्हिडिओंच्या माध्यमातून पेपर सोडविण्याच्या अचूक टिप्स दिल्या जातील.

पोलीस महाभरतीची घोषणा केल्याबद्दल स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह आघाडी सरकारचे अभिनंदन केले आहे.

पोलीस भरतीसाठी राज्यातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात तयारी करतात. या भरतीमध्ये शहरासह गावखेड्यांतील युवावर्ग अधिक संख्येने सहभागी होतो. लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाते. मात्र, लेखी परीक्षेबाबत सर्व उमेदवारांना शिकवणी वर्ग लावून मार्गदर्शन मिळविणे शक्य नसते. हीच समस्या लक्षात घेऊन स्वयम् सामाजिक संस्थेतर्फे पोलीस भरती ऑनलाईन मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी असणा-या मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या अभ्यासघटकांवर विषयतज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाईल. हा सर्व अभ्यासक्रम उमेदवारांना मोबाईलवर उपलब्ध असेल.

सोबतच सर्व घटकांवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सोडवता येईल. किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या आणि पोलीस भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी ९०४९७६३८४९ किंवा ९८२३४१८४५७ या क्रमांकावर मॅसेजद्वारे आपले नाव नोंदवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयम् संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे.