Published On : Mon, Jan 27th, 2020

एक हजार मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

‘नई दिशा’ प्रकल्पांतर्गत उपक्रम : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चा पुढाकार

नागपूर : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेने नागपूर महानगरपालिका शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये ‘नई दिशा’ प्रकल्प सुरू करण्यात आला. याअंतर्गत गणतंत्र दिनाचे औचित्य साधून सुमारे एक हजार विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

गडचिरोली येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेने किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीच्या कालावधीतील दिवसांवर अभ्यास केला. त्या अभ्यासाचे निष्कर्ष विद्यार्थिनींच्या मन:स्थितीची माहिती देणारे आहेत. हा अहवाल महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांच्यासमोर सादर केला. अहवालाच्या आधारे विद्यार्थिनींची समस्या सोडविण्यासाठी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त, शिक्षणाधिकारी यांच्या पुढाकारातून २८ डिसेंबर रोजी साने गुरुजी मनपा उर्दु शाळेत पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांची विद्यार्थिनींसोबत संयुक्त सभा घेतली.

यावेळी मुलींनी शाळेतील मासिक पाळी व्यवस्था समस्यांबाबत आपल्या भावना व्यक्त केला. त्याचवेळी महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी मनपाच्या खर्चातून विद्यार्थिनींच्या समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने २६ जानेवारी रोजी मनपा शाळांतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आली. इतर व्यवस्थाही लवकर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.