Published On : Sat, Sep 29th, 2018

एक महिन्याचे वीज बिल तब्बल साडेतीन लाख रुपये !

Advertisement

नागपूर : नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील गाळेधारक धास्तावले आहेत.

बेसा-बेलतरोडी परिसरात वसंतनगर पिपळा रोड बेसा येथे हे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये अंकुश एकलारे, अमोल तुपकरी, मयुर अवसरे, प्रसाद वाघ, विजय घोनमाडे, नितीन मते, सुधीर धोपे, डॉ. उमक, विनोद श्रीभाविकर, देवेन कोरडे, पंकज मोहतेकर, आदेश झा आणि सावन एकलारे असे १३ कुटुंब राहतात. या गाळेधारकांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रत्येकाकडे व्यक्तिगत वीज मीटर आहे.

पाण्याची मोटार आणि पार्किंगच्या लाईटसाठी एक कॉमन मीटरही याठिकाणी आहे. या मीटरचं बिल दर महिन्याला तीन ते चार हजाराच्या दरम्यान यायचं. ते सुद्धा अधिकच होते. बिल जास्त येते म्हणून गेल्या महिन्यातच नवीन मीटर लावण्यात आलं. मात्र बिलाची रक्कम कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढली. सप्टेंबर महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार एवढे वाढले. त्यामुळे गाळेधारकांना धक्काच बसला. आता हे बिल कसं भरायचं असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाढलेले बिल घेऊन स्थानिक विद्युत विभागाच्या कार्यालयात गेले. तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता ‘बिल कमी होणार नाही. तुम्ही ऊर्जामंत्र्यांना भेटला तरी चालेल’ असे उलट उत्तर मिळाले. यामुळे नागरिक अधिकच धास्तावलेले आहे.