Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Nov 13th, 2019

  आठवड्यातील एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा

  आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन : डेंग्यू रोगाबाबत घेतला आढावा

  नागपूर : शहरात वाढत्या डेंग्यूचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. बुधवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आरोग्य विभागाची डेंग्यूबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

  यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, हिवताप नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी दीपाली नासरे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

  प्रारंभी आयुक्तांनी महिन्याभरात डेंग्यूचे किती रूग्ण आढळले याबाबत झोननिहाय आढावा घेतला. त्यावर विभागाने काय कार्यवाही केली त्याबाबत जाणून घेतले. मनपाच्या अख्यत्यारीत शहरातील १०७ नोंदणीकृत दवाखाने आणि १०६ रक्त तपासणी केंद्र असून त्यांच्यामार्फत डेंग्यूसदृश्य रूग्णांची माहिती मनपा प्राप्त होत असल्याची माहिती उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली. शहरातील सर्व रक्त तपासणी केंद्र हे मनपाकडे नोंदणीकृत करण्यात यावे. त्यांना मनपाद्वारे इंटेन्सिव्ह देण्याबाबत विचार करण्यात यावा. डेंग्यूबाबत ज्या तक्रारी आपल्याला प्राप्त होतात, त्याठिकाणी फवारणी करण्यात यावी. त्याठिकाणी भेट द्यावी. डेंग्यूसदृश्य रुग्ण ज्याठिकाणी आढळतात त्या ठिकाणी भेट दिली असता आजूबाजूचा परिसरही तपासून बघावा. त्याठिकाणीही फवारणी करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.

  मलेरिया व फायलेरिया विभागामार्फत आलेला अहवाल विभाग प्रमुखांनी नीट तपासून संबंधित रुग्णाला फोन करून त्याबाबत खातरजमा करावी व आवश्यक असल्यास प्रत्यक्षस्थळाला भेट द्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

  डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळल्यास मनपाद्वारे काय कार्यवाही कऱण्यात येते याची नियमावली विभागप्रमुखांनी तयार करावी व ती सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात जाहिरातीद्वारे याबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

  आयसीईद्वारे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये चर्चा केली. आयसीईमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात य़ावे व त्याची जनजागृती माध्यमांमार्फत करण्यात य़ावी, असेही आय़ुक्तांनी सांगितले.

  कोरडा दिवस कसा पाळावा?
  डेग्यू हा आजार एडिस डासापासून होतो. या डासांमार्फतच या रोगाचा प्रसार होतो. या डासांची अंडी ही अडगळीच्या वस्तूंत साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये वाढते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व अडगळीची स्थाने कोरडी करावी. रिकामे टायर, कुलर यासारख्या भंगारच्या वस्तूंमध्ये पाणी साचून राहते. ते कोरडे करावे. घऱातील वापरण्यायोग्य पाण्याची भांडी धुवून पुसून कोरडी करावी. घरातील परिसरात कुठेही पाणी साचून राहणार याची काळजी घ्यावी, असेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आलेले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145