Published On : Mon, Mar 26th, 2018

सावरोली ग्रामपंचायतीमध्ये एक कोटीचा भ्रष्टाचार; आमदार सुनिल तटकरे यांनी लक्षवेधीतून केली कारवाईची मागणी


मुंबई: रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांनी संगनमताने एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आज सभागृहात मांडत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

दरम्यान या भ्रष्टाचाराला जबाबदार असणारे आणि भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आणि शासनाकडे केलेल्या अपीलावर एका महिन्यात निकाल घेणार असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले.

सावरोली ग्रामपंचायतीच्या २०१५-१६ च्या लेखापरीक्षणात एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल स्थानिक निधी लेखा परिक्षा यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता. कोकण विभागीय आयुक्त यांनीही भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम या कायद्यानुसार सावरोली गावातील सरपंच, उपसरपंच यांना पदावरून काढण्याचे आदेश ९ जानेवारी २०१८ रोजी दिले होते. या आदेशावर १५ दिवसात राज्य शासनाला अपील करणे व एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्याची तरतूद अधिनियमात आहे. तरीसुद्धा चौकशीची जबाबदारी असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याने एका महिन्यात चौकशी पूर्ण केलेली नाही. याबद्दल आमदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकार कायद्याचा गैरवापर करत भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तसेच चौकशी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी केली.

Advertisement

यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन अपील विहित कालावधीत निकालात काढू असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement