नागपूर -उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भरधाव वेगाच्या वाहनाने कहर केला. सीताबर्डीतील आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर भरधाव वॉक्सवॅगन कारने ओव्हरटेक करताना दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सोमवारी पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पिंटू दाड़े हे आपल्या टाटा झेस्ट कारने झिरो माईलवरून राहत चौकाच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या वॉक्सवॅगन कारने आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला त्या कारने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, कार पुलावर स्किड होऊन मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनावर आदळली. अपघातात मालवाहू आणि कार दोन्हींच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत वॉक्सवॅगन कारमधील चालक व त्याचा सहप्रवासी तसेच इतर एकजण असे तिघेजण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फिर्यादी पिंटू दाड़े यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वॉक्सवॅगन कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सीताबर्डीतील आदिवासी गोवारी उड्डाणपूल हा नागपूरमधील अतिशय वर्दळीचा पूल आहे. मात्र अपघाताच्या वेळी वाहतूक तुलनेने कमी होती, अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होती. पोलीस अधिक तपास करीत आहेत.