
नागपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात दुपारी साधारण तीनच्या सुमारास घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने रहिवाशांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. पीडब्ल्यूडी क्वार्टरमधील एका मीटर बॉक्सच्या केबिनमधून अचानक सळसळण्याचा आवाज येऊ लागल्याने परिसरातील नागरिक सतर्क झाले.
मीटर बॉक्स उघडून पाहिले असता आत घोरपड (इंडियन मॉनिटर लिझर्ड) लपून बसल्याचे दिसताच रहिवासी घाबरून गेले. काही क्षणांतच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि क्वार्टरमधील नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली. भीती आणि कुतूहल यांच्या मिश्र वातावरणात तातडीने वन्यजीव बचाव पथकाला कळविण्यात आले.
माहिती मिळताच ‘वाइल्ड अॅनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटी’चे अध्यक्ष, नागपुरातील प्रसिद्ध वाइल्डलाईफ रेस्क्यूअर शुभम जी. आर. घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा वेध घेत त्यांनी अत्यंत शांततेने आणि कौशल्याने मीटर बॉक्समधील घोरपडीला बाहेर काढले. संपूर्ण कारवाईदरम्यान त्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत नागरिकांनाही सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.
यशस्वी बचावानंतर घोरपडीला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. शुभम जी. आर. यांच्या तत्परतेमुळे एक बेजुबान प्राण्याचे प्राण वाचलेच, शिवाय परिसरातील संभाव्य धोका देखील टळला.
नागपुरात वन्यजीव संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शुभम जी. आर. यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अशा संवेदनशील आणि प्रशिक्षित रेस्क्यू टीमची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.








