नागपूर : मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे २०२२-२३ हे शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे..राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव समारंभ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवारी (दि. ४) आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे उद्या दुपारी ३:३० वाजता आयोजित या शताब्दी महोत्सव समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील विशेष अतिथी राहतील. ४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाची सुरुवात झाली त्यावेळी ९१७ विद्यार्थी आणि ४ विद्या शाखा होत्या. १०० वर्षांत विद्यापीठाने सर्वच क्षेत्रांत ऐतिहासिक प्रगती केली.
विद्यापीठात माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. इतका गौरवशाली इतिहास असणाऱ्या विद्यापीठाचा शतकोत्तर महोत्सवही उत्सवात करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासाठी विद्यापीठाची तयारी झाली असून शतकोत्तर वर्ष समितीची स्थापनाही करण्यात आली होती.