नागपूर: सोमवार २५ जूनला रा. स्व. संघ सोमलवाडा नागरतर्फे ‘हिंदू साम्राज्य दिनोत्सव’ हा समाजोत्सव म्हणून सहपरिवार साजरा करण्याचे ठरविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, नृशंस मोगलाईत शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
ज्या काळात हिंदू देवळे फोडली जात होती, हिंदू रयतेवर अनन्वित अत्याचार होत होते, अशा भयंकर प्रलयंकारी काळात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माला स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव, स्वाभिमानाची पुनःप्राप्ती करून दिली. हिंदूंच्या इतिहासात ही घटना महत्वाची ठरली.
भारतवर्षात अनेक राजे-राजवाडे होऊन गेलेत. पण, म्लेच्छांना निष्प्रभ करून भारतात हिंदूंचे साम्राज्य ही संकल्पना शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणून रयतेला स्वराज्य, न्याय आणि पालकत्वाचा विश्वास दिला.
या घटनेचे स्वाभिमानी स्मरण व्हावे म्हणून रा. स्व. संघातर्फे शिवराज्यभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव सोमलवाडा नागरतर्फे व्यंकटेशनगर खामला रोडवरील अर्जुना सेलिब्रेशन सभागृहात होणार आहे. रात्री ७ वाजता आयोजित या कार्यक्रमाला देवनाथ मठ पिठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज उद्बोधन करतील. सोमलवाडा नगर संघसंचालक श्रीकांत चितळे यांनी नागरिकांना या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आश्वासनही केले आहे.
