
नागपूर : स्टील पाइपांच्या आडून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) पथकाने कारवाई करत सुमारे 500 किलो गांजा जप्त केला असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
NCBच्या मुंबई झोनल युनिटला गांजाच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. ओडिशातील संबलपूर येथून गांजाची खेप घेऊन एक ट्रक नागपूरमार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने नागपूर-भंडारा मार्गावर नजर ठेवली.
रविवारी पहाटे हुडकेश्वर परिसरातील आउटर रिंग रोडवरील महादेव ढाब्याजवळ संशयित ट्रक अडवण्यात आला. ट्रकची झडती घेतल्यानंतर स्टील पाइपांच्या मध्ये लपवून ठेवलेला सुमारे 500 किलो गांजा आढळून आला. हा माल इंदूरच्या दिशेने नेला जात असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणात आर.पी. गोलदार, ए. सरकार आणि एस.ए.एस. युसूफ ऊर्फ राजाभाई यांना अटक करण्यात आली आहे. यातील राजाभाई हा नागपुरात राहून तस्करीच्या नेटवर्कसाठी गांजाच्या खेपा स्वीकारत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
NCBच्या माहितीनुसार, युसूफ गेल्या चार ते पाच वर्षांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही NDPS कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तस्कर पोलिस आणि तपास यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी मार्ग बदलून लांबचा प्रवास करत असल्याचेही समोर आले आहे.
या तस्करीच्या नेटवर्कमागे आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा NCBकडून तपास सुरू असून, संबंधितांच्या शोधासाठी पुढील कारवाई केली जात आहे. या प्रकरणाची नोंद हुडकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



