
नागपूर : कलमना परिसरात चाकू घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा ई-रिक्षा चोरीतील सहभाग उघडकीस आला. ओमप्रकाश ऊर्फ ढोकू सुरेश निषाद असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त केला आहे.
3 ऑक्टोबर रोजी कलमना रेल्वे स्टेशन परिसरात एक तरुण चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ओमप्रकाश निषाद याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासताना ई-रिक्षा चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग समोर आला.
18 सप्टेंबरच्या रात्री योगेश मासूरकर हे ई-रिक्षाने भरतवाड्याकडे जात होते. चिखली गेटजवळ लघुशंकेसाठी त्यांनी ई-रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर ई-रिक्षा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने ई-रिक्षा चोरी केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. चोरीच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या ई-रिक्षेचा वापर केला जात होता. चोरीचा माल ठिकाणी पोहोचवल्यानंतर ई-रिक्षा वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवत असल्याची माहितीही तपासात समोर आली.
आरोपीच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी पंचांसमक्ष सुमारे 50 हजार रुपये किमतीची चोरीची ई-रिक्षा जप्त केली. या कारवाईमुळे ई-रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



