Published On : Mon, Jun 24th, 2019

आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल

Advertisement

नागपूर : वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कुशल चालकांना व्यावसायिक वाहन परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपुरात याचा फायदा शेकडो चालकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दररोज रस्त्यावर नव्या गाड्यांची भर पडत आहे. ‘ऑटोमोबाईल्स’ क्षेत्र कमालीचे वाढत आहे. देशात २२ लाखांहून अधिक वाहन चालकांची गरज आहे.

मात्र सरकारच्या आधीच्या नियमानुसार अवजड वाहन परवाना मिळण्यासाठी किमान आठवा वर्ग पास असणे बंधनकारक होते. यामुळे अशिक्षित व्यक्ती व्यावसायिक वाहन परवानापासून वंचित होत्या. दूरदृष्टी आणि देशात उपलब्ध असलेले रोजगार याचा विचार करून, दळणवळण मंत्रालयाने यातील शिक्षणाची अटच शिथिल केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ या कायद्यातील सुधारणेसाठी याबाबत थेट अध्यादेशाचा मार्ग निवडला. यामुळे चालक बनण्यासाठी आता पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याला महत्त्व येणार आहे. देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या वाढण्याचीही शक्यता आहे.

१७ लाखांवर पोहचली वाहनांची संख्या
उपराजधानीत वाहनांची संख्याही १७ लाखांवर पोहचली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, ऑटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने आहेत. प्रवासी व मालवाहतुकीचे नवे पर्याय समोर येत आहे. यात व्यावसायिक परवानासाठी शिक्षणाची अट शिथिल करण्यात येणार असल्याने याचा फायदा उपराजधानीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील कुशल चालकांना होणार आहे.