Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 2nd, 2020

  रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास

  कडक कारवाईचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश : दंड आणि शिक्षेची तरतूद

  नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्याअंतर्गत नागपुर शहरात सार्वजनिक ‍ ठिकाणी धुम्रपान करणा-या व पान, सुपारी तंबाखुजन्य पदार्थचे सेवन करणा-या, थुंकणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथका (NDS) सह विविध अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात 1 जून रोजी स्वतंत्र आदेश निर्गमित केला असून नागपुरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीच्या अधिन राहून तसेच भादंविच्या तसेच मुंबई पोलीस ‍ अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

  थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते व विद्रुप झालेल्या भिंती पुन्हा-पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कर रुपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशासनास भाग पडते व यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो व याचा दुष्परिणामामुळे कर्करोग, श्वसन आजार, पुनरुत्पादन संस्थेचे आजार, पचनसंस्थेचे आजार तसेच क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, न्युमोनिया यांसारख्या प्राणघात आजारांचा फैलाव होतो. आता तर कोवीड सारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याने निष्पन्न झाल्याने याबाबत अतिदक्षता घेऊन सर्व जनतेच्या हितास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेस्तव शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे दि. 29.05.2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

  सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या, धुम्रपान करणा-यास मुंबई पोलिस अधिनियम कलम 1951 च्या कलम 116 अनुसार पहिल्या गुन्हासाठी 1000 रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तिला दुस-या गुन्हासाठी 3 हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिस-या व त्यानंतरच्या गुन्हासाठी 5 हजार रुपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 269 अंतर्गत 6 महिने शिक्षा किंवा दंड ‍, कलम 270 अंतर्गत 2 वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 272 अंतर्गत 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 278 अंतर्गत रुपये 500 पर्यंत दंड चा प्रावधान आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा 2003 च्या कलम 4 चा अंतर्गत रुपये 200 पर्यंत दंड, कलम 5 अंतर्गत पहिला गुन्हासाठी रु. 1000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हासाठी रु. 5000 पर्यंत दंड किंवा 5 वर्षे शिक्षा, कलम 6 अ, 6 ब साठी रु. 200 पर्यंत दंड, कलम 7 अंतर्गत उत्पादकाला पहिला गुन्हासाठी रु. 5000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही तसेच दुस-या गुन्हासाठी रु. 10,000 पर्यंत दंड किवा 5 वर्षांची शिक्षा होवू शकते. विक्रेतांना पहिला गुन्हाला रु 1000 पर्यंत दंड किंवा 1 वर्षाची शिक्षा व दुस-या गुन्हयासाठी रु 3000 पर्यंत दंड किंवा 2 वर्षे अशी शिक्षेची तरतूद करण्यात आले आहे.

  हे आदेश नागपूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध मंडळे, परिमंडळ, महामंडळे, औद्योगिक वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थाने, बगीचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी आणि आवारातही हा कायदा लागू राहील.

  या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे नागपूर महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे विविध पोलिस अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

  नागरिकांनी या शहराची स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुरक्षेची जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकून सदर प्रतिबंधीत कृत्य करुन्‍ अन्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नये, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

  नागरिकांसोबतच संबंधीत दुकानदारांनी, व्यवसायीकानीं सुध्दा याबाबीचे गंभीर्य लक्षात घेवून सदर आदेशाचे पालन करावे. स्वादिष्ट/सुगंधीत तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधीत सुपारी यांची निमिर्ती, साठवण, वितरण किंवा विक्री यावर सुध्दा शासन आदेशानुसार प्रतिबंध करण्यात आले आहेत.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145