मुंबई :राज्यातील काही सत्ताधारी मंत्र्यांकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची प्रतिमा धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत थेट नाराजी व्यक्त करत सर्व मंत्र्यांना कडक इशारा दिला आहे.
फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता वादग्रस्त विधानं किंवा कृती अजिबात सहन केली जाणार नाहीत. अशा गोष्टींमुळे सरकारची बदनामी होते आणि विरोधकांना संधी मिळते.” त्यांनी हे देखील नमूद केले की, अशा प्रकारांचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होऊ शकतो.
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचित केलं आहे की, ही ‘अखेरची संधी’ आहे. यानंतर अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी सर्व मंत्र्यांना जबाबदारीने आणि संयमाने वागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
महायुतीच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सध्या सरकारवर टीकेची झोड उठलेली असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थिती हाताळण्याची गंभीर भूमिका घेतली आहे.