Published On : Mon, Apr 9th, 2018

भाजपच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करणारः अशोक चव्हाण

Advertisement

मुंबई: निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील व राज्यातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. समाजात शांतता, सलोखा, बंधुत्वाची भावना कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक दिवसाचा लाक्षणिक उपवास करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज उपवास केला. तत्पूर्वी सकाळी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले जवान शुभम मस्तापुरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी भाजप सरकारच्या जातियवादी भूमिकेवर जोरदार टीका केली. भाजप देशभरात द्वेष पसरविण्याचे काम करित आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. जातीय दंगलींमध्ये भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे सिध्द झाले आहे पण दुर्देवाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. भीमा कोरेगाव सारख्या घटना घडवून मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचे काम राजकीय स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे. देशातील एकूण परिस्थिती चिंताजनक झाली असून दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत सामाजिक एकोपा जपून बंधुत्वाची भावना वाढवण्याची मोठी जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांवर आहे. भाजप देश तोडण्याचे काम करित आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोडण्याचे काम करावे. भाजपला राज्याच्या आणि देशाच्या विकासाची चिंता नसून निवडणुका जिंकण्याची जास्त चिंता आहे. सामाजिक शांतता, सलोखा आणि बंधुत्वाची भावना राहिल्याशिवाय कुठल्याही राज्याचा देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. भाजपच्या सत्ताकाळात हे शक्य नाही त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी सज्ज व्हावे असे खा. चव्हाण म्हणाले.


देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ येथे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे, आ. मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे, आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे, आ. अमर राजूरकर, आ. अमिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे, आ. शरद रणपिसे, आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे, आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे व राज्यातील इतर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपवास करून भाजप सरकारच्या जातियवादी भूमिकेचा निषेध केला.