Published On : Tue, Jul 13th, 2021

ना. गडकरींच्या मार्गदर्शनात नागपुरात सुरु आहेत विकासाचे नवनवे प्रयोग

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्तेवर आलेले भाजपा सरकार आल्यापासून आणि ना. नितीन गडकरी यांनी महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण देशात रस्ते बांधकाम आणि अन्य क्षेत्रात विकासाचे नवनवे प्रयोग केले जात आहेत. नागपुरातही ना. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विकासाचे असे यशस्वी प्रयोग सुरु आहेत. वास्तविक हे प्रयोग म्हणजे नवे संशोधनच आहे, असेही भविष्यात म्हणावे लागणार आहे.

वर्धा रोडवर पहिल्यांदाच साकारलेला डबल डेकर पूल. देशात प्रथमच असा पूल ना. गडकरी यांच्यामुळे नागपुरात यशस्वी उभा झाला. आता तर संपूर्ण देशात डबल डेकरचे हे डिझाईन प्रसिध्द झाले आणि वापरातही येत आहे. कोणताही नवीन प्रयोग करायचा असेल तर तो पहिल्यांदा नागपुरातच करायचा हा ना. गडकरींचा आग्रह असतो. नुकताच प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर हिंगणा रोडवरील राजीवनगर ते झेंडा चौक इसासनी या रस्त्यावर करण्यात आला. हा पूर्ण रस्ता सिमेंटचा आहे. पण प्रयोगादाखल फक्त 450 मीटर लांबीचा रस्ता प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला. या नावीण्यपूर्ण बांधकामाची पाहणीही ना. गडकरी यांनी केली. हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर सिमेंट रस्त्यांसाठी केला जाईल. सिमेंट रस्त्यापेक्षा अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात हे बांधकाम करून रस्ता तयार करता येतो.

दुसरा प्रयोग हिंगणा टी पॉईंट ते एमआयडीसी टी पॉईंट या रस्त्यावर सुरु आहे. हा रस्ताही सिमेंटचा होत आहे. व्हाईट टॉपिंग या तंत्राचा अवलंब करून या रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याची पाहणीही ना. गडकरी यांनी नुकतीच केली आहे. व्हाईट टॉपिंग हाही सिमेंटचाच रस्ता आहे. पण सिमेंट रस्त्यापेक्षा कमी खर्चात तो तयार होतो. एकूणच खर्चात बचत करून आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर ना. गडकरींचा भर असतो. जे बोलले त्याप्रमाणे केले पाहिजे, त्याचाच प्रत्यय या कामाने दिला आहे. अशा प्रयत्नांमुळे अनेक प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होण्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच रस्ते बांधकाम करताना कामाच्या दर्जाशी कोणताही समझोता न करता ते वेळेत पूर्ण करावे असे स्पष्ट निर्देश व्हाईट टॉपिंग रस्त्याच्या बांधकामासाठीही ना. गडकरींनी दिले आहेत. व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्यात सिमेंट रोड कमी खर्चात आणि कमी वेळात झालेले दिसतील.

जैविक इंधनाचा प्रयोगही नागपुरातूनच सुरु आहे. 8 लाख कोटींचे आयात होणार्‍या क्रूड ऑईलवर स्वदेशी पर्याय म्हणून जैविक इंधन निर्मितीचे प्रयोग सुरु आहेत. ऊसाच्या रसापासून, मक्यापासून, तांदळापासून इथेनॉल निर्मिती, धानाच्या तणसापासून सीएजी, एलएनजी निर्मिती यावर अधिक भर देऊन कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न आहे. सार्वजनिक वाहतूक सीएनजीवर आणि मालवाहतूक एलएनजीवर आणण्याचा प्रयोगही ना.गडकरी यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. नुकताच नागपुरात देशातील पहिल्या एलएनजी पंपांचे उद्घाटनही ना. गडकरी यांनी करून हा प्रयोग यशस्वी असल्याचे सिध्द झाले आहे. एवढेच काय तर महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक करणार्‍या बसेस ना. गडकरींमुळेच सीएनजीवर चालू लागल्या आहेत. स्वत: ना. गडकरींचा ट्रॅक्टरही सीएनजीवर रुपांतरित झाला आहे. आगामी काळात महापालिका अधिकार्‍यांची चार चाकी वाहनेही इथेनॉलवर आणण्याचा प्रयत्न आहे.

करंज या झाडाच्या बियांपासून इंधन निर्मितीचा प्रयोगही सुरु आहे. जैविक इंधन निर्मितीतून शेतकरी समृध्द, संपन्न व्हावा आणि क्रूड तेलाच्या प्रचंड आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर येणारा ताण नाहीसा होऊन आयातीला पर्याय उपलब्ध करणारा हा प्रयोग आहे. जैविक इंधन निर्मितीचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि आंदोलने लक्षात घेता भविष्यात अधिकाधिक भारतीयांना जैविक इंधनाचाच आधार घ्यावा लागणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

एकूणच ना. गडकरी यांच्या मार्गदर्शनात नवीन संकल्पना आणि नवे प्रयोग करून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांच्या विभागामार्फत केला जातो आहे. यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा सुरु असते. अनेकांच्या भेटीतून आणि अनुभवातून नवीन संशोधन समोर येते. या संशोधनाचा कोणत्या प्रकल्पासाठी कसा वापर करता येईल, याचे चिंतन ना. गडकरींचे सतत सुरु असते. या चिंतनातच प्रयोगांची यशस्वीता आणि विकास सामावलेला आहे.