
मुंबई : लिअरजेट विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आणि थेट आरोपांची सरबत्ती केली. “अजितदादा गेले, याचं दुःख सत्ताधाऱ्यांना नाही; मात्र VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
रोहित पवारांनी सादरीकरणाच्या माध्यमातून अपघाताशी संबंधित काही मुद्दे मांडले. संबंधित लिअरजेट विमानाची भारतात नोंदणी होऊ शकत नसतानाही ती करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. DGCA मधील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे रजिस्ट्रेशन झाले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे विमान अमेरिकेतील कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते आणि त्याची अनेक वेळा खरेदी-विक्री झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह-
इतक्या मोठ्या अपघातानंतर तपास यंत्रणा घटनास्थळी उशिरा पोहोचली, असा आरोप करत रोहित पवारांनी तपासातील ढिलाईवर टीका केली. “लिअरजेटसारख्या विमानाची तांत्रिक माहिती अधिकाऱ्यांना नसणे ही गंभीर बाब आहे. आम्ही सत्तेबाहेर असूनही माहिती मिळवू शकतो, तर सरकारी यंत्रणा नेमकं काय करत आहे?” असा सवाल त्यांनी केला.
१५ फेब्रुवारीपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र त्याचे पुढे काय झाले, याबाबत त्यांनी सरकारला जाब विचारला.
VSR कंपनीभोवती संशयाचे सावट-
अपघातग्रस्त VSR कंपनीवर अद्याप ठोस कारवाई का झालेली नाही, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात राज्यातील काही सत्ताधारी नेते उपस्थित होते, असा दावा करत त्यांनी काही छायाचित्रांचा उल्लेख केला. तसेच आंध्र प्रदेशातील तेलुगू देशम पक्ष (टीडीपी) चे प्रमुख नेतेही त्या समारंभात हजर होते, असे त्यांनी सांगितले. सध्या केंद्रात नागरी उड्डाण मंत्रालय टीडीपीकडे असल्याचा संदर्भ देत त्यांनी या नातेसंबंधांवर प्रश्न उपस्थित केले.
“ज्या कंपनीच्या विमानामुळे हा अपघात झाला, त्या कंपनीचा मालक सध्या देशाबाहेर आहे. त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप रोहित पवारांनी केला.
कॉल रेकॉर्ड तपासणीची मागणी-
VSR कंपनीचे मालक विजय सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “कोणत्याही दबावाखाली तपास वळवू नका. या दुर्घटनेत आमच्या कुटुंबातील व्यक्तीचा जीव गेला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर भाष्य-
या प्रकरणावर भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अपघाताच्या दोन दिवस आधी राज्यात मोठी राजकीय घटना घडेल, असे सूचित करणारे ट्विट करण्यात आले आणि नंतर ते हटवण्यात आले, असा उल्लेख करत त्यांनी संशय व्यक्त केला.
या सर्व आरोपांमुळे विमान अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी अधिक तीव्र होत आहे.








