नागपूर : मा. पंतप्रधानांबद्दल निंदनीय आणि खेदजनक शब्दात टीका करणाऱ्या काँग्रेसच्या शेख हुसेन यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजपा नेत्यांनी केली होती. या मागणीचे निवेदन देण्यास भाजपाचे पदाधिकारी नागपूर पोलीस मुख्यालयात गेले होते. परंतु त्यावेळी कुठलीही पत्रपरिषद झाली नसल्याची स्पष्टोक्ती माजी मंत्री, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मा. पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु ऐन वेळी आलेल्या पत्रकारांना उत्तरे देणे भाग पडल्याचे सांगत, येथे कुठलीही पूर्वनियोजित पत्रपरिषद झाली नसल्याचे आ. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सोबत आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी दालनाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले असे आ. बावनकुळे यांनी सांगितले. या घटनेबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्वालाताई धोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. आमच्या आंदोलनातून समाजात चुकीचा संदेश जाऊ नये आणि जे घडलेच नाही त्याची चर्चा होणे योग्य नाही. अशा गैरसमजातून ज्वालाताई धोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करू नये असे वाटते. भाजपाच्या आंदोलनाची वस्तुस्थिती समाजासमोर येणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.