नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारकडून विविध उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. चारा टंचाई, कर्जमाफी, मायक्रो फायनान्स तसेच जिल्हानिहाय परिस्थितीचा साप्ताहिक बैठकीत आढावा घेतला जात आहे. या प्रश्नांवर रोहित पवार यांनीही सरकारसोबत चर्चेला यावे. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून दुष्काळाच्या प्रश्नाला राजकीय स्वरूप देऊ नये, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा न होण्यामागे फार्मर आयडी नसणे हे एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्यांनी ३० तारखेपर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय २० ते २२ लाख शेतकऱ्यांच्या पीक पाहणीची प्रक्रिया सुरू असून, ई-केवायसी पूर्ण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी राज्य सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात असून, महसूल विभागाच्या अखत्यारीतील जागा नगरविकास विभागाला उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मेट्रो स्थानकाला ड्रॅगन पॅलेसचे नाव देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी वापर करण्याचे सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इंदापूरमधील तहसीलदारांविरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी केली जाईल आणि त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना या प्रकरणाची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित बाबींची वस्तुस्थिती तपासल्यानंतरच बोलता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.




