नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण व उपाययोजनांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. ०९) टास्क फोर्सची बैठक पार पडली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. यावेळी शहरातील विविध हेल्थ अँड वेलनेस सेंटरच्या (एचडब्लूसी) कामकाजाची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच अधिक धोकादायक भागांमध्ये लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश श्रीमती वसुमना पंत यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये आयोजित टास्क फोर्स समितीच्या बैठकीत मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रजानन व बालकल्याण अधिकारी डॉ सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, सीपीएम डॉ. अश्विनी निकम, पीएचएन अर्चना खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) डॉ. शिल्पा नेर्लिक्कल यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी शहरातील विविध झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या एचडब्लूसी विषयी माहितीचा आढावा सर्व झोनल आरोग्य अधिकाऱ्यांकडून घेतला. एचडब्लूसीच्या जागेविषयी काही अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. तेथे लागणाऱ्या आवश्यक साहित्याची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. शहरात लवकरात लवकर एचडब्लूसीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी झोनल अधिकाऱ्यांना दिले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड यांनी बैठकीतील मुद्यांची माहिती दिली. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. नवजात बालकांपासून ते गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जाते. या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये यावर भर देण्यात आला.
जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण करण्याची गती वाढविणे, झोन अंतर्गत खासगी प्रसूतीगृहांमध्ये जन्म झालेल्या बालकांची माहिती घेणे तसेच नियमित त्या प्रसूतीगृहांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना डॉ. मोहम्मद साजीद यांनी दिले. झोनमधील लसीकरणाच्या विविध अधिक धोकादायक भागामध्ये झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्याची नोंद ‘गूगल फॉर्म’ मध्ये करावी असे निर्देश यांनी दिले. तसेच लायन्स क्लबतर्फे देण्यात आलेल्या मोबाईल वॅनच्या मदतीने शहरात लसीकरण करावे असेही ते म्हणाले. युपीएचसीचे विविध भागांमध्येवर्गी करणकरावे. नियमित लसीकरणासंदर्भात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करणे, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेणे आदी निर्देशही यावेळी देण्यात आले.
ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा भागामधील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावी, गरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावे, लसीकरणासाठी आशा अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घ्यावे. संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी दिले.