Published On : Thu, Nov 26th, 2020

महामार्गांच्या 16 योजनांचे ना. गडकरींच्या हस्ते लोकार्पण, कोनशिला अनावरण

-उत्तरप्रदेशात 7477 कोटींचे 505 किमी महामार्ग
-महामार्गांमुळे उप्रचे चित्रच बदलणार
-येत्या 3 वर्षात 2 लाख कोटींचे महामार्ग बनवणार

नागपूर: उत्तर प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आज महामार्गाच्या 16 योजनांचे लोकार्पण, कोनशिला अनावरण व एका कामाचा शुभारंभ केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आला. या योजनांवर 7477 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून 505 किमीचे महामार्ग तयार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात महामार्गांच्या या जाळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या विकासाचे चित्रच बदलणार असून आगामी काळात उत्तरप्रदेश सुखी, संपन्न व समृध्द राज्य बनेल असा विश्वास ना. गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग व अन्य उपस्थित होते. गेल्या 6 वर्षाच्या काळात उत्तरप्रदेशात महामार्गांच्या लांबीमध्ये 40 टक्के वाढ झाली असून 7643 किमीवरून आज 11389 किमी महामार्गांची लांबी झाली आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आतापर्यंत 2 लाख कोटी रुपये उत्तर प्रदेशच्या महामार्गांसाठी खर्च झाले असून येत्या 3 वर्षात पुन्हा 2 लाख कोटींचे महामार्ग आम्ही तयार करू. यात सिमेंट रोडचाही समावेश असेल. सन 2014 ते 2020 पर्यंत 42 हजार कोटी खर्च करून 3700 किमी महामार्गांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

महामार्गांसाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादनासाठी तीन वर्षात 26 हजार कोटी रुपये देण्यात आले असून 2020-21 मध्ये 65 हजार कोटींचे 2900 किमीचे महामार्ग पूर्ण करण्यात येणार आहेत. यात 42 महामार्गांचा समावेश आहे, असे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, 2020-21 मध्ये 680 किमीचे 7205 कोटींच्या कामांचे अवार्ड देण्यात आले असून यात 5 आरओबी आणि एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. राज्य शासनाने सुचविल्याप्रमाणे रामवन गमन मार्गाच्या भूसंपादनासाठी 452 कोटी रुपयांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याशिवाय 50 हजार कोटींच्या 24 कामांचा आणि 3500 किमी महामार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. प्रस्तवित योजनांमध्ये गाजीपूर बलिया माझीघाट 4 लेन ग्रीनफिल्ड तयार करण्याची योजना असून प्रयागराज रिंगरोड तीन टप्प्यात बनविण्याची योजना आहे. याशिवाय खासदारांनी दिलेल्या महामार्गांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली असल्याचे ना.गडकरी यांनी सांगितले.

प्रयागराज येथे राष्ट्रीय जलमार्ग पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच मल्टीमोडल हबची कामेही सुरु असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- गंगेवर जलमार्ग विकसित झाले तर उत्तरप्रदेशला त्याचा मोठा फायदा होईल. एमपीबीएस सी-प्लेनचा विचार उत्तरप्रदेशने करावा. प्रयागराज ते वाराणसी गंगेच्या किनार्‍यावर जी शहरे आहेत, तेथे सी-प्लेन सेवा सुरु करता आली तर पर्यटनाच्या दृष्टीने उत्तरप्रदेशला अधिक महत्त्व प्राप्त होईल व रोजगार निर्मिती होईल. बौध्द सर्किटसाठी साडे 4 हजार कोटींचे महामार्ग बनवून बौध्द सर्किट जोडले जाणार आहे. महामार्गाची कामे करताना कामाचा दर्जा आणि वेळेत काम पूर्ण करणे यात कोणताही समझोता आम्ही करीत नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याप्रसंगी म्हणाले- उत्तर प्रदेशचा गेल्या 65 वर्षात झाला नाही, त्यापेक्षा जास्त महामार्ग विकास गेल्या सहा वर्षात झाला आहे. या महामार्गांमुळे उत्तर प्रदेशाच्या विकासाची गती अधिक वाढणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 6 वर्षात उत्तर प्रदेश एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उत्तरप्रदेशच्या विकासाचे वेगळे चित्र निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.