नागपूर: शहरातील १५० चौ. मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या व्यवसायिक प्रतिष्ठान, संस्थांना आता अग्निशमन विभागाचे ना-हरकरत, परिपूर्णता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल. दोन्ही प्रमाणपत्र नसल्यास संबंधित संस्था किंवा प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अग्निशमन समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिला आहे.
अग्निशमन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, उपसभापती प्रमोद चिखले, समिती सदस्य विरेंद्र (विक्की कुकरेजा), लहूकुमार बेहते, राजकुमार साहू, वनिता दांडेकर, सहायक आय़ुक्त महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
व्यवसायिक हेतुसाठी १५० चौ. मीटरच्यावर बांधकाम असेल आणि रहिवासी इमारत जर १५ मीटरपेक्षा उंच असेल तर अग्निशमन विभागाचे ना-हरकरत प्रमाणपत्र, परिपूर्णता प्रमाणपत्र, सूचना पत्र या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ज्या संस्थांनी, व्यवसायिकांनी रहिवासी इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे मात्र, त्याचा वापर व्यवसायाकरिता करण्यात येत आहे अशा सर्व व्यावसायिकांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सभापतींनी दिले. अग्निशमनचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसारच भरती करण्यात यावी, त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थांनाच भरती करण्यात यावे, असा ठराव समितीने पारित केला. प्रशासनाने हा ठराव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यानंतर नाहरकत प्रमाणपत्र, सूचनापत्र, परिपूर्णता प्रमाणपत्र निर्गमित करण्यापूर्वी समितीला विचारात घ्यावे, कोणत्याही प्रमाणपत्रावर कार्यवाही झाल्यास त्याचा अहवाल समितीला सादर करावा, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. ज्या इमारतीला अग्निशमन प्रतिबंधात्मक योजना लावण्यात आली नाही त्याची यादी तयार करून स्टेशन अधिकाऱ्यामार्फत समितीला सादर करावी असे आदेश त्यांनी दिले.
बैठकीला अग्निशमन सर्व स्थानकाचे स्थानाधिकारी उपस्थित होते.