Published On : Tue, Mar 28th, 2017

महिलांनी कुंकू लावण्याची, मंगळसुत्र घाल्याण्याची आवश्यकता नाही – न्यायालय

नागपूर: जग हे एकविसाव्या शतकात वाटचाल करते आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात महिलांकडून डोक्यावर पदर घेणे, कुंकू लावणे, मंगळसुत्र घालणे या अपेक्षा करता येऊ शकत नाही. तसेच, या गोष्टींचा त्याग केला म्हणून कोणतीही महिला क्रुर ठरू शकत नाही. तसेच, हे घटस्फोटाचेही कारण होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक खटल्यात नोंदविले आहे. न्यायालायलाचे हे निरीक्षण म्हणजे पुरूषप्रधान संस्कृतीसाठी मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे.

नागपूरमध्ये राहणारा कार्तिक आणि कामठी येथील रहिवासी समिधा (दोन्ही नावे बदललेली) यांचा 21 जून 1995 मध्ये विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पारंपरीक पद्धतीने त्यांनी संसार सुरू केला. संसार सुरू असताना त्यांना लग्नानंतर साधारण 14 महिन्यांनी एक कन्यारत्नही झाले. दरम्यानच्या काळात कार्तिकने आपली नोकरी सोडली आणि व्यवसाय करण्याचा गाट घातला. कार्तिकच्या मनात व्यवसाय करण्याचे पक्के होते. मात्र, त्यासाठी भांडवल कमी होते. भांडवल उभारणीसाठी त्यांने पत्नी समिधावर माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. मात्र, समिधाने त्यास नकार देताच. कार्तिकने तिच्यावरील दबाव वाढवला आणि तिचा छळही सुरू केला.

दरम्यान, कार्तिक आणि समिधा यांच्यात 2 ऑक्टोबर 2000मध्य कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर कार्तिकने तिला घराबाहेर काढले. त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत ती घराबाहेरच होती. मात्र, कार्तिकने तिला घरातच घेतले नाही. दरम्यन, तिने कार्तिकच्या कुटूंबियांना माहिती दिली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. घरातल्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. शेवटी ती बहीण व जावयाच्या मदतीने माहेरी परतली. त्यानंतर तिने सासरी परतण्याचा प्रयत्न केला असता तिला घरात प्रवेश देण्यात आला नाही.


दरम्यान, हे प्रकरण अधिकच ताणले. कार्तिकने समिधासोबत घटस्फोट घेण्यासाठी कौटूंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यावर त्याने उच्च न्यायालयात आपील केले. न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमोर या खटल्यावर सुनावनी झाली. कार्तिकने केलेल्या याचिकेत समिधा ही कुंकू लावत नाही, डोक्यावर पदर घेत नाही, तसेच, मंगळसुत्रही घालत नाही, तिचे वागणे हे अतिशय क्रुर असल्याचे आरोप केले. तिच्या या क्रूर वागण्यामुळेच मला घटस्फोट हवा आहे, असेही कार्तिकचे म्हणने होते. दरम्यान, नवऱ्याने केलेल्या आरोपांच्या आधारावर घटस्फोट देता येऊ शकत नाही. शिवाय नवऱ्यानेच तिला घराबाहेर हाकलून लावले, असे तिने सिद्ध केले असल्याचे मत नोंदवित न्यायालयाने अनुरागला घटस्फोट नाकारला.

अनुराक आणि समिधाचे प्रकरण कौटूंबिक असले तरी, त्यावर न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे. या निरीक्षणामुळे पुरूषप्रधान संस्कृतीला मोठा धक्का बसला आहे.