Published On : Mon, Feb 1st, 2021

पोलिओ डोजपासून एकही बालक वंचित राहू नये : महापौर

पोलिओ निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ : १,९२,३८७ बालकांनी घेतला पोलिओ डोज

नागपूर: पल्स पोलिओ निर्मूलन अभियानांतर्गत रविवारी (ता. ३१) ‘पोलिओ रविवार’ पाळण्यात आला. याअंतर्गत आज नागपूर शहरातील एक लाख ९२ हजार ३८७ बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. ही टक्केवारी ६९.५९ इतकी असून शहरातील एकूण दोन लाख ७६ हजार ४७३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट असून २ फेब्रुवारीपासून आरोग्य विभागातर्फे घरभेटीतून आज डोज न घेतलेल्या बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येईल.

नागपूर शहरात ‘पोलिओ रविवार’चा शुभारंभ महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका श्रद्धा पाठक, सुमेधा देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, एस.एम.ओ. डॉ. साजीद खान, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, डॉ. टिकेश बिसेन, पल्स पोलिओ नोडल अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, डॉ. सीमा कडू, डॉ. शमा मुजावर, शीतल गोविंदवार, डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा, लॉयन्स क्लबचे बलविंदर सिंग उपस्थित होते.


महापौर दयाशंकर तिवारी यांनी अनन्या पाठक या बालिकेला पोलिओ डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. नागपुरात भविष्यात एकही पोलिओ रुग्ण आढळू नये यासाठी नागपुरातील सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरातील एकही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नागपूर शहरातील मनपाअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमध्ये एकूण १५२९ बुथ लावण्यात आले होते. शहरातील मनपाचे सर्व दवाखाने, स्वयंसेवी संस्थांचे दवाखाने, शासकीय दवाखाने, रेल्वे दवाखाने आदी ठिकाणी बुथ होते. रेल्वे स्टेशन, गणेश मंदिर, स्वामीनारायण मंदिर, बस स्थानके, विटा भट्ट्या, चुंगी नाके येथे ट्रांझीट टीमच्या माध्यमातमून पोलिओ डोज पाजण्यात आला. विमानतळ, बांधकामे, रस्त्यावरील बालकांना मोबाईल टीमच्या माध्यमातून पोलिओ डोज देण्यात आला. शहरातील बालरोग तज्ज्ञांकडेही पोलिओ लस देण्याची सोय करण्यात आली होती. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या नेतृत्वात नोडल अधिकारी डॉ. वैशाली मोहकर आणि अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या देखरेखीत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सर्व झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. देवस्थळे, डॉ. मंगला पुरी, डॉ. बकुळ पांडे, डॉ. जैतवार, डॉ. मंजुषा मठपती, डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा, डॉ. मिनाक्षी माने, डॉ. रश्मी वाघमारे, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. आतिक खान यांच्यासह आरोग्य विभागाच्या संपूर्ण चमूने मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

२ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घरभेटी
‘पोलिओ रविवार’ अंतर्गत जे बालक पोलिओ डोज घेण्यापासून वंचित राहिले असतील अशा बालकांचा शोध आरोग्य विभागाची चमू घरभेटीच्या माध्यमातून घेणार आहेत. २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील सर्व घरांना भेट देऊन पोलिओ डोजपासून वंचित राहिलेल्या बालकांना डोज पाजण्यात येणार आहे. शहरातील १०० टक्के बालकांना पोलिओ डोज पाजण्याचे उद्दिष्ट असून सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज देण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.