Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

महायुतीत कडूपणा नको; बच्चू कडूंना प्रवीण दरेकरांचा टोला

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरही पलटवार
Advertisement

मुंबई : विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांच्या अलीकडील वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना महायुतीतील नेत्यांनी संयमाने भूमिका मांडावी, असे सांगितले. बच्चू कडू यांनी त्यांच्या नावाप्रमाणे महायुतीत “कडू” वातावरण निर्माण करू नये, असा टोला लगावत त्यांनी अशा विधानांमुळे आघाडीतील वातावरण बिघडू शकते, असे म्हटले.

दरेकर म्हणाले की, बच्चू कडू हे महायुतीतील घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे केवळ प्रहार संघटनेचे प्रमुख म्हणून नव्हे, तर महायुतीचा भाग म्हणून त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून, फुटकळ विधानांमुळे भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये केली जात असतील, तर त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना दरेकर यांनी महापौर आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. शहरातील सुरू असलेली विकासकामे, सिमेंट काँक्रीटीकरण आणि मुंबईची भौगोलिक रचना यामुळे काही अडचणी निर्माण होत असल्या तरी सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मुख्यमंत्री वॉर रूममधून नियमित आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

चेंबूर येथील दुर्घटनेप्रकरणी त्यांनी केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून भागणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

राज ठाकरे यांच्या आमदारांबाबतच्या वक्तव्यावरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. आमदारांचा अवमान म्हणजे त्यांना निवडून देणाऱ्या लाखो मतदारांचाही अवमान असल्याचे सांगत, अशा विधानांमुळे हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.