Published On : Tue, May 5th, 2020

तीनशे युनिट वीज बिल माफीवर अजूनही कारवाई नाही : बावनकुळे

-उर्जामंत्र्यांना स्मरणपत्र

नागपूर: 5 मे कोरोना महामारीमुळे सुमारे 2 महिन्यापासून संचारबंदी आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक कुचंबणा होत आहे. अशा स्थितीत 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज बिल माफ करण्याची मागणी आपण केली होती.

पण ऊर्जा मंत्र्यांनी यावर अजूनही कोणतीच कारवाई केली नाही. उर्जामंत्र्यांनी ऊर्जा विभागाला त्वरित निर्देश देऊन 300 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आदेश काढावे अशी मागणी माजी उर्जा मंत्री व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका स्मरण पत्राद्वारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पुन्हा केली आहे.

संचारबंदीमुळे अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. अशा वेळी गरीब कुटुंबाना वीज बिल माफ केले तर तेवढाच दिलासा मिळेल. परिस्थिती सामान्य होण्यास आणखी 2 ते 3 महिन्याचा काळ लागू शकतो. त्यामुळे मुंबईसह राज्यातील शून्य ते शंभर व शून्य ते तीनशे युनिट प्रतिमाह वीज वापर करण्याऱ्या गरीब ग्राहकांना संपूर्ण वीज बिल माफ केले पाहिजे. संचारबंदीच्या काळातील हे बिल असेल. कृपया ऊर्जामंत्री राऊत यांनी त्वरित कारवाई करावी ही विनंती माजी ऊर्जामंत्री व माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी केली आहे.