Published On : Tue, May 8th, 2018

मनपाच्या परिवहन विभागाचा प्रस्तावित वार्षिक अर्थसंकल्प समितीला सादर

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०१७-१८ चे सुधारीत अर्थसंकल्प आणि सन २०१८-१९ चा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्याकडे सोपविला.

सदर अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने परिवहन उपक्रमांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत जे-जे स्वतंत्र शीर्ष अर्थसंकल्पामध्ये नियोजित करावयाचे होते त्या सगळ्या बाबींचा प्रामुख्याने ह्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘शहर परिवहन निधी’ हे शीर्ष परिवहन उपक्रमाच्या परिचलनाकरिता उघडण्यात आलेले आहे. महसुलाच्या जादा शिलकीचा विनियोग करण्याकरिता अंदाजपत्रकात एका स्वतंत्र शीर्षाखाली ‘महसुली राखीव निधी’ या नावाचे स्वतंत्र शीर्ष उघडण्यात आले आहे. ‘परिवहन सुधारणा निधी’ सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक सहल, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी व इतर घटकांना सवलत देण्याकरिता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय, पथ अंत्योदय योजनेअंतर्गत आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याकरिता ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत स्वतंत्र शीर्ष उघडण्यात आले आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चालू अर्थसंकल्पीय वर्षात परिवहन विभागाच्या विकासात व प्रशासकीय कामात गतीमानता आणण्याच्या दृष्टीनेही काही योजना पूर्णत्वास नेण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने २५ बायोगॅस व ७० इलेक्ट्रिक ए.सी. बसेस शहर बस सेवेत दाखल करणे, प्रवासी उपलब्धता व आवश्यकतेनुसार शहराच्या जास्तीत जास्त विविध मार्गावर बसेसची सेवा देणे, मनपाच्या विविध जागांवर बस ऑपरेटरकरिता वर्कशॉप व डेपो विकसित करणे, पार्किंगच्या जागा निर्माण करून पार्किंग शुल्क वसुलीद्वारे शहर बस सेवेत होणारी तूट भरून काढणे, शहर बसेसवर तसेच बस स्टॉपवर जाहिरातीसाठी कंत्राट देऊन उत्पन्न घेणे, बस डेपो आणि सर्व बसेसमध्ये संनिरिक्षण प्रणाली (सीसीटीव्ही) निर्माण करणे, महिलांकरिता तेजस्विनी बस सुरू करणे आदींचा यात समावेश आहे.

परिवहन विभागाच्या बैठकीला सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समिती सदस्य सर्वश्री प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, अभिरुची राजगिरे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, मनिषा धावडे, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरिश दुबे, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखा अधिकारी भारद्वाज, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, केदारनाथ मिश्रा आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement