Published On : Fri, Mar 27th, 2020

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली भाजी, दुध, किराणा, औषधीची घरपोच व्यवस्था

Advertisement

नागपूर : लॉकडाऊनदरम्यान कुणीही व्यक्ती घराबाहेर पडू नये यासाठी मनपा प्रशासन नागरिकांच्या सुविधेसाठी निरनिराळे प्रयत्न करीत आहेत. काही औषधी दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आणि शहरातील ४५ दुकानातून घरपोच किराण्याची व्यवस्था केल्यानंतर आता भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळण्याचीही व्यवस्था मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून करण्यात आली आहे.

शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांशी कृषी विभागाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला असून त्यांना फोन केला की त्यांच्या माध्यमातून भाजीपाला घरपोच उपलब्ध होणार आहे.

याचप्रकारे दूधविक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांशीही चर्चा करून हे पदार्थही घरपोच मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाजीपाला, दूध आणि दूग्धजन्य पदार्थांसाठी सुमारे १४० विक्रेत्यांची यादी मोबाईल क्रमांकासह प्राप्त झाली असून ही यादी मनपाच्या अधिकृत वेबसाईट आणि फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.

ह्या यादीमधील मोबाईल क्रमांकावर फोन करून नागरिकांना आता भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ घरीच मागविता येतील.कृषी विभागाच्या सहकार्याने सुध्दा शेतकरी भाजीपाला नागपूरच्या विविध भागात उपलब्ध करणार आहे. त्यांची देखील यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

शहरातील रामदासपेठ, रविनगर, लकडगंज, मेडिकल चौक अशा मुख्य परिसरातील दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांचा घरपोच सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. १५ एप्रिलपर्यंत अनावश्यक कामासाठी मुळीच बाहेर पडू नये. कोरोनापासून बचावासाठी ही सोय आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.