Published On : Wed, May 30th, 2018

मनपा शाळांतील गुणवंतांचा कार्यकारी महापौर पार्डीकर यांच्या हस्ते सत्कार

Advertisement

10th Student Satkar Photo 30 May 2018 (1)
नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी (ता. ३०) घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे. विज्ञान शाखेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर (७६ टक्के), कला शाखेतून साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी शिरीन परवीन हमीद खान (८१.५४ टक्के) आणि वाणिज्य शाखेतून एम. ए. के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सालेहा अंजुम (७८.१५ टक्के)आणि रफानाझ (७८.१५) ह्यांनी संयुक्त प्रथम येण्याचा मान पटकाविला.

विज्ञान शाखेतून प्रथम तीनही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेतील आहेत. या शाखेत द्वितीय क्रमांक मृणाल सुधाकर पानतावणे (७४ टक्के) तर तृतीय क्रमांक नकुल ज्ञानेश्वर ठाकरे (७३.६९ टक्के) यांनी पटकाविला. कला शाखेतून दुसरा क्रमांक साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सुमेला परवीन मो. जफर खान, तृतीय क्रमांक एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या शायदा बेगम (७१.२३), वाणिज्य शाखेतून द्वितीय क्रमांक एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची शबीना परवीन (७५ टक्के) हिने पटकाविला.

सर्व गुणवंतांचा यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते महापौर कक्षात सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका प्रमिला मंथरानी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांचा सत्कारानंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, मनपा शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मनपाच्या शाळेत हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबांची पाल्ये शिकतात. त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. यापुढेही प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकवृदांनी बरीच मेहनत घेतली. ९३ टक्के शाळांचा निकाल लागणे यावरून त्यांची मेहनत दिसून येते. मनपाच्या शाळेतूनही चांगले विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे या शाळेकडे विद्यार्थी वळविण्याचा प्रयत्न सध्याचे सभापती करीत आहेत, असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विभागाचे प्रशांत टेंभुर्णे यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी देशकर, साने गुरुजी उर्दू उच्च प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती समीरा अली, एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निखत खान उपस्थित होते.

शाळानिहाय निकाल :

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळा (विज्ञान शाखा : ९३ टक्के)

-साने गुरुजी उर्दू उच्च प्रा. शाळा (वाणिज्य शाखा : ९०.९० टक्के)

-ताजाबाद उर्दू उच्च माध्यमिक शाळा (विज्ञान शाखा : ९२.३० टक्के, कला शाखा : ८७.५ टक्के, वाणिज्य शाखा : ५० टक्के)

-एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळा (विज्ञान शाखा : ९२ टक्के, कला शाखा : ८१ टक्के, वाणिज्य शाखा : ७४ टक्के)