Published On : Wed, Jul 1st, 2020

आयुक्तजी, खोटे खुलासे करून नागपूरकरांची दिशाभूल करु नका : महापौर संदीप जोशी

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या आरोपांवर खुलासा करीत त्यांनी केलेल्या आरोपाचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, आयुक्त खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. त्यांनी एक पत्र जारी करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेला प्रत्येक खुलासा कसा खोटा आहे, हे सांगितले आहे.

महापौरांनी जारी केलेल्या पत्रात थेट आयुक्तांनाच आव्हान दिले आहे. आयुक्त साहेब, खोटे खुलासे करून नागपूरकरांची दिशाभूल करू नका, असे त्यांनी म्हटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या खुलास्यात ‘चेअरमन यांनी मला मोबाईलवर निर्देश दिले’ असे म्हटले आहे. यावर महापौर संदीप जोशी म्हणतात, आयुक्तजी, यापूर्वी मीडियाशी बोलताना आपण चेअरमन साहेबांनी पत्रावर लिहून दिले, असे सांगितले आहे. दि. २३ जूनला पहिल्यांदा व दि. ३० जूनला दुसऱ्यांदा आपणास पत्राची प्रत मागितली. पण आपण ती दिली नाही. आणि आता आपण मोबाईलवर चेअरमन यांनी निर्देश दिल्याचे सांगत आहात. किती खोटेपणा असे म्हणत आपण कायद्याचे जाणकार आहोत. हे सांगा की, मोबाईलवरील निर्देश देण्याचे वा घेण्याचे अधिकार कोणत्या कायद्यात नमूद आहेत, असा प्रतिप्रश्नच महापौरांनी केला आहे.

‘ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करताना आणि बायो-मायनिंगचे जाहीर करताना चेअरमनशी चर्चा केली’, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खुलास्यात लिहिले आहे. ह्या मुद्यावरही प्रतिप्रश्न करीत महापौर संदीप जोशी म्हणतात, आयुक्तजी, संचालक मंडळाने मंजूर केलेल्या निविदा रद्द करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याद्वारे आपल्याला मिळाला याचा देखिल खुलासा नागपूर जनतेसमोर कराल काय?

‘काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे’ या आयुक्तांच्या खुलास्यावर प्रश्न उपस्थित करीत महापौर संदीप जोशी म्हणतात, स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने नियुक्त केलेले कर्मचारी बडतर्फ करण्याचा अधिकार आपणास कोणत्या कायद्याने दिला, याचादेखिल खुलासा होईल काय?

‘कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही’ या खुलास्यावर बोलताना महापौर संदीप जोशी म्हणतात की आपणास अधिकार नसताना बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्मार्ट सिटीच्या खात्यावर आपली स्वाक्षरी कशी आली? आपण बिले कशी दिलीत, याचाही आपण खुलासा करावा.

‘सीईओ (?) म्हणून काम करताना कोणतीही अनियमितता आली नाही’ या आयुक्तांच्या स्पष्टीकरणावर महापौर म्हणतात, आयुक्तजी, ज्या बोर्डावर आपण संचालकच नाही, तिथे सीईओ म्हणून ताबा घेणे तर दूरच, बँकेमध्ये आपल्या स्वाक्षरी कशा आल्यात? आपण २० कोटींचे पेमेंट कसे काय केले? याचाही खुलासा जनतेसमोर कराल काय?

‘संचालक मंडळाची बैठक कोरोनाच्या परिस्थितीमुळे होऊ शकलेली नाही. सदर बैठक प्रस्तावित आहे,’ असेही आयुक्तांनी म्हटले आहे. यावर बोलताना महापौर म्हणतात, आयुक्तजी, आपण २८ जानेवारीला आलात. आपल्या म्हणण्यानुसार ११ फेब्रुवारीला आपणास चेअरमननी ‘सो कॉल्ड’ चार्ज दिला. नागपुरात कोव्हिड-१९ची पहिली केस ११ मार्चची म्हणजे महिन्याभरानंतरची आहे. या महिनाभरात आपण संचालक मंडळाची बैठक घेण्यासाठी चेहरमनशी काय पत्रव्यवहार केला, हे जनतेला सांगाल काय? त्याचप्रमाणे जबाबदारी नसताना निर्णय घेणे व त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत पूर्वगामी (Retrospective) मंजुरी घेणे कोणत्या कायद्यात आहे, हे देखिल नागपूरकर जनतेला खुलास्याद्वारे सांगाल काय?

आयुक्तजी, आता आपण केलेल्या गडबडी, अनियमितता या सावरण्याकरिता आपण येणाऱ्या १५ दिवसात बोर्डाची मीटिंग घेऊन ह्या गडबडी दुरुस्त करण्याचा केविलवाणा खटाटोप कराल, हे नागपूर जनता बघेलच.

आयुक्त साहेब, आपण नियमाच्या विरोधात जाऊन संपूर्ण काम केले. नियम तोडलेत. खोटे ठराव देऊन बँकेत स्वाक्षरी घुसवली, हे स्पष्ट आहे. कृपया असे खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल आतातरी करु नका, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.