Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 1st, 2020

  कोरोना योद्ध्यांप्रति महापौरांनी व्यक्त केली कृतज्ञता

  आरपीटीएस, व्‍हीएनआयटी केंद्रास भेट : विलगीकरणातील व्यक्तींची केली आस्थेने विचारपूस

  नागपूर : कोरोनाच्या या संकटाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. हे कार्य दुरून पाहणा-यांना साधे वाटत असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देण्याचे हे कार्य कठीण आहे. या कार्याची तुलनाच होउ शकत नाही, अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी कोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

  शहरातील अलगीकरण केंद्रांच्या पाहणी अंतर्गत बुधवारी (ता.१) महापौर संदीप जोशी यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस) आणि व्‍हीएनआयटी येथील विलगीकरण कक्षाला भेट दिली. याप्रसंगी उपमहापौर मनीषा काठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, व्‍हीएनआयटी विलगीकरण कक्षाचे इंसिडंट कमांडर श्री. खैरनार तसेच केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दानीश यांच्यासह आरपीटीएस विलगीकरण केंद्राचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  यावेळी महापौर संदीप जोशी यांनी विलगीकरणातील नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. जेवण आणि इतर सर्व सुविधांसंबंधी नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली. कोणतिही तक्रार असल्यास त्वरीत संबंधितांना कळविण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरातील विलगीकरण कक्षामध्ये राधास्वामी सत्संग ब्यासच्या वतीने जेवण पुरविण्यात येते. आज आषाढी एकादशी निमित्ताने विलगीकरणातील सर्व नागरिकांसाठी राधास्वामी सत्संग ब्यासतर्फे विशेष फराळ देण्यात आल्याची माहिती देत सर्व नागरिकांनी मनपा आणि संस्थेचे आभार मानले.

  कोरोनाच्या या संकट काळात वैद्यकीय आणि इतर विभागाची चमू मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र काम करीत आहे. या काळात घरापासून दूर राहत प्रत्येकच अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. अशा कठीण प्रसंगी सेवेसाठी पुढे आलेल्यांचे कार्य नागपूरकर सदैव स्मरणात ठेवणार आहेत. या सर्व कोव्हिड योद्ध्यांचे सर्व नागपुरकर सदैव ‌ऋणी राहतील, अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145