Published On : Mon, Aug 20th, 2018

नागरिकांची विश्वासाहर्ता कायम ठेवून कर संकलन करा : संदीप जाधव

Advertisement

नागपूर : झोनमधील प्रत्येक वार्डमधून कर संकलन करताना नागरिकांशी योग्य समन्वय साधला जावा याकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे. प्रत्येक नागरिकाच्या मनात नागपूर महानगरपालिकेविषयी विश्वासाहर्ता कायम राहिल हे लक्षात घेउनच कर संकलनाची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी कर निरीक्षक व कर संकलक यांना दिले.

सोमवारी (ता. २०) धंतोली झोनमध्ये कर आकारणी व कर संकलन विशेष समितीची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह झोनमधील सर्व वार्डचे कर निरीक्षक व कर संकलक प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेकडे कर हेच एकमेव उत्पन्नाचे स्त्रोत आहे. मात्र वेळेवर नागरिकांकडून कर भरणा होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही स्थिती सुधारण्यासाठी सर्व कर निरीक्षक आणि कर संकलकांनी वेळेवर बिल पोहोचविणे, नागरिकांना वेळोवेळी कर भरण्याबाबत ‘रिमांईंडर’ देणे, निर्धारित कालावधीमध्ये कर न भरणा-यांच्या नावाने ‘वॉरंट’ काढून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करणे आदी कामे वेळेवर करावी, असेही श्री. जाधव यांनी यावेळी निर्देशित केले. झोनमधील विविध वार्डच्या कर संकलनाबाबतीतील कामाच्या दिरंगाईवर सभापती संदीप जाधव यांनी नाराजी वर्तविली.

कर निरीक्षक व कर संकलन यांनी आपल्या शैलीचा उपयोग करून नागरिकांशी समन्वय साधावा. कर भरण्याबाबत नागरिकांचे योग्य समुपदेशन होईल, त्यांच्याशी योग्य संवाद साधला जाईल, याकडे लक्ष देण्यात यावे. कर निरीक्षक व कर संकलक यांना नागरिकांपर्यंत जावे लागत असल्याने नागरिकांच्या अडचणीही त्यांनाच ऐकून घ्याव्या लागतात. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण प्रक्रियेचा योग्य अभ्यास करून नागरिकांना संपूर्ण प्रक्रियेची योग्य माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

कर संकलन प्रक्रियेमध्ये येणा-या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका तत्पर असून झोमधील सर्व कर निरीक्षक व कर संकलकांनी स्थानिक नगरसेवकांचेही सहकार्य घ्यावे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता येईल, असा विश्वास समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.