Published On : Thu, Oct 11th, 2018

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी समिती सदैव कार्यरत राहील!

Advertisement

नागपूर : दुर्बल घटक समिती मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी निर्माण झाली असून, मागासवर्गीयांच्या समस्या सोडविणे हे समितीचे मुख्य काम आहे. झोपडपट्टी व शहरातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी समिती सदैव कार्यरत राहील, असा विश्वास दुर्बल घटक समितीचे अध्यक्ष हरिश दिकोंडवार यांनी व्‍यक्त केला.

गुरूवारी (ता. ११) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात दुर्बल घटक समितीची पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य गोपीचंद कुमरे, निरंजना पाटील, वंदना भगत, अमर बागडे, शकुंतला पारवे, राजेंद्र सोनकुसरे, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, वैशाली नारनवरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त रवींद्र देवतळे, कार्यकारी अभियंता (एस.आर.ए. व स्लम) आर.जी. रहाटे, उपअभियंता आर.जी. खोत आदी उपस्थित होते.

मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर देखरेख व अंमलबजावणीसाठी महापौरांनी समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील वस्त्यांचा विकास व्हावा तसेच मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजनेवरील खर्च योग्य प्रकारे होते किंवा नाही यासाठी सदैव प्रयत्न करून तळागळातील लोकांच्या समस्या सोडविण्यात याव्‍यात, असेही सभापती हरिश दिकोंडवार यांनी यावेळी सांगितले. दुर्बल घटक समितीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नागपूर शहरात एकूण २९५ ‘नोटीफाईड स्लम’ आहेत. या सर्व ‘स्लम’ची विभागानुसार विस्तृत माहिती तसेच विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे असलेली जबाबदारी याची संपूर्ण माहिती पुढील बैठकीत सादर करा, असेही सभापती हरिश दिकोंडवार यांनी निर्देशित केले. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ होणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची माहिती देऊन जबाबदारी स्पष्ट केल्यास विविध योजनांना गती मिळेल, असेही श्री. दिकोंडवार यावेळी म्हणाले.