Published On : Wed, Sep 5th, 2018

प्रीती भोयर यांच्यासह पाच जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार व दहा जणांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. बुधवारी (ता.५) शिक्षक दिनानिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हा पुरस्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार यांच्यासह शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील, शिक्षण समिती उपसभापती भारती बुंडे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्या प्रमिला मंथरानी, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यावेळी बोलताना म्हणाल्या, विद्यार्थी जीवनात असताना विद्यार्थ्याला आई वडील जसे घडवतात त्याचप्रमाणे त्यांचे शिक्षकही घडवत असतात. विद्यार्थ्यांना घडविण्यामागे शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर हातभार असतो. महापालिकेच्या शाळांमधून प्रज्ञावंत विद्यार्थी घडावेत यासाठी महापालिकेच्या शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची जी संधी सर्व शिक्षकांना मिळाली आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. महापालिकेच्या शाळांचा संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जादेखील नक्कीच सुधारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी प्रत्येक झोनमधून एक आदर्श शाळा तयार होण्यासाठी मनपा प्रशासन काम करेल, असा विश्वास दिला. यानंतर महापालिकेच्या शाळेमधून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रारंभी बॅ.शेषराव वानखेडे माध्यामिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी तर आभारप्रदर्शन सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांनी केले.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक

१) श्रीमती प्रीती प्रदीप भोयर, दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळा, २) श्रीमती मधू चंद्रशेखर पराड, संजयनगर हिंदी माध्यामिक शाळा, ३) सूर्यकांत भास्करराव मंगरूळकर, संजयनगर हिंदी माध्यामिक शाळा, ४) अशोक विरकुटराव बालपांडे, जानकीनगर मराठी प्राथमिक शाळा ५) श्री. रामकृष्ण गाढवे, सुभाषनगर प्राथमिक शाळा

उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार

१) श्रीमती अश्वीनी फत्तेवार, एकात्मता नगर उच्च प्राथमिक शाळा, २) श्रीमती भावना बजाज, जी.एम.बनातवाला इंग्रजी प्राथमिक शाळा, ३) विनय बरडे विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक शाळा, ४) सुभाष उपासे, जयताळा माध्यमिक शाळा, ५) श्रीमती निखत रेहाना, एम.के.आझाद उर्दू माध्यमिक शाळा, ६) श्रीमती परिहार, वाल्मिकी नगर हिंदी माध्यामिक शाळा, ७) संजय पुंड, लालबहादूर शास्त्री हिंदी माध्यामिक शाळा, ८) श्रीमती अकिला खानम, गरीब नवाज उर्दू प्राथमिक शाळा, ९) श्रीमती वंदना माटे, महाराणी उच्च प्राथमिक शाळा, १०) श्रीमती रजनी देशकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर माध्यामिक शाळा