Published On : Thu, Feb 28th, 2019

मनपा कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन

Advertisement

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतरही सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने महापालिकेच कर्मचार उद्या शुक्रवारी (ता.1) मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहे. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांसह आंदोलनात महिला कर्मचारीसुद्धा केस कापणार आहेत.

अनेक महिन्यांपासून सहा वेतन आयोगाची 59 महिन्यांची थकबाकी, 84 महिन्यांच्या महामागी भत्त्याची थकबाकी तसेच सातवा वेनत आयोग लागू करावा याकरिता महापालिका कर्मचाऱ्यांची समन्वय समिती आंदोलन करीत आहे. यापूर्वीसुद्धा मुंडण आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. सर्व मागण्या मान्य केला. त्याचे लेखी पत्रही संघटनेला दिले. त्यामुळे मुंडण आंदोलन स्थगित करण्यात आले होते. 19 तारखेला महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त, भाजपचे पदाधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक झाली.

मात्र यात कुठलाही तोगडा निघाला नाही. त्यामुळे 26 फेब्रुवारीला मुंडण आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आयुक्तांनी गुरुवारी बैठक बोलावल्याने आंदोलन पुन्हा पुढे ढकलण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीतही आयुक्तांनी सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने उद्या शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीस शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांच्यासह गौतम गेडाम, देवराव मांडवकर आदी उपस्थित होते.

महिलाही कापणार केस
संविधान चौकात मोठ्या प्रमाणात मुंडण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचारी अद्यापक भवन येथे सकाळी नऊ वाजतापासून तर इतर कर्मचारी त्यांच्या कार्यालयात मुंडण करतील. संविधान चौकात दुपारी 12 वाजता दहा कर्मचारी मुंडण करणार आहेत. यात दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश राहील.