
नागपूर : मनपा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना भाजपाने या वेळी तिकीटवाटपात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात निष्क्रिय ठरलेल्या माजी नगरसेवकांना यंदा तिकीट न देण्याची भूमिका पार्टीने स्पष्ट केली आहे.
भाजपाने उमेदवार निवडीसाठी घेतलेल्या व्यापक सर्वेक्षणात मागील कार्यकाळातील कामगिरी, जनसंपर्क, क्षेत्रातील उपस्थिती आणि संघटनात्मक योगदानाचा बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे. प्रारंभिक अहवालात असे अनेक माजी नगरसेवक आढळले आहेत, ज्यांनी पाच वर्षांच्या काळात ना क्षेत्रात काम केले, ना लोकांशी संपर्क ठेवला. त्यामुळे अशांच्या तिकिटावर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने वार्ड पातळीपासून आमसभेपर्यंत कार्यकर्ते आणि नागरिकांकडून थेट प्रतिसाद (फीडबॅक) गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक भागातून अशी तक्रार समोर आली आहे की काही माजी नगरसेवक निवडून आल्यानंतर अक्षरशः गायब झाले होते. विकासकामांकडे दुर्लक्ष आणि नागरिकांशी संपर्काचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर भाजपाने ‘सक्रियता’ हा तिकीट निवडीचा मुख्य निकष मानण्याचे ठरवले आहे. प्रभारी आणि सहप्रभारी स्तरावर मुलाखतींची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांचे संघटनात्मक योगदान, उपलब्धता, लोकांशी नाते आणि भविष्यातील कामाची दिशा तपासली जात आहे.
पक्ष नेतृत्वाचा ठाम विश्वास आहे की निष्क्रिय नगरसेवकांना पुन्हा संधी दिल्यास नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि निवडणुकीत परिणामांचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे अनेकंचे ‘पत्ते कट’ होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
भाजपाचा कल यंदा नव्या चेहऱ्यांना आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याकडे आहे. पक्षाचा उद्देश संघटनेची प्रतिमा बळकट करणे आणि नागपूरकरांचा विश्वास पुन्हा जिंकणे हा असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.









