Published On : Mon, Dec 9th, 2019

21 किमी अर्ध मॅरेथॉन: एक अनुभव

Advertisement

मॅरेथॉन या लांब पल्याच्या रेस बद्दल लहानपणापासून मला खूपच उत्सुकता होती. हे धावपटू इतकं जीव तोडुन इतके मोठे अंतर कशाला आणि का धावत असतील? यांना दम नसेल लागत का? आपल्याला तर थोडे धावलो तरीही धाप लागते..! याच खूपच कुतूहल वाटायचं. पण पुढे मी त्यात अधिक खोलात गेलो नाही आणि ही उत्सुकता सुप्त राहिली. मला आठवतंय पोलीस सब इन्स्पेक्टर साठी शारीरिक क्षमतेची चाचणी परीक्षेत मी लांब उडी, पुल-अप्स यात पूर्ण मार्क घेतले पण 800 मी अंतर निर्धारित वेळेत धावू न शकल्यामुळे माझे भरपूर मार्क गेले होते. आपण या प्रकारात कमी आहोत याची प्रकर्षाने तेंव्हा जाणीव झाली होती. ( तरीही थिअरी आणि इतर इव्हेंट मध्ये चांगले मार्क असल्यामुळे माझी निवड झाली होती ही गोष्ट अलाहिदा.)

मुबईला पोस्टिंग असताना सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंगचे नितांत सुंदर अनुभव घेतले. यात व्यक्तीच्या स्टॅमिनाचा कस लागतो. त्यावेळी माझी एक ट्रेक फ्रेंड यामिनीने ती मॅरेथॉन धावते अस सांगितलं आणि माझी उत्सुकता पुन्हा चाळवली गेली. अशातच तिने माझा ट्रेकिंगचा Stamina बघून तुम्हीही मॅरेथॉन धावू शकाल अशी मनात ठिणगी टाकून त्याला हवा दिली. झालं मी या दृष्टीने गंभीरपणे विचार करायला लागलो. पण मोठी अडचण होती.. माझ्या उजव्या गुढघ्यात दोन लिगामेंट्स ज्या गुडघ्याला आधार देत असतात त्यात लहानपणी पासून खेळलेल्या क्रिकेटमुळे मोठी दुखापत झाली होती. मुंबईला MRI scan करून याची खात्रीही झाली आणि सर जेजे हॉस्पिटलचे डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. पण माझे AIIMS दिल्ली येथील सर्जन मित्र डॉ. श्री महेश नायकुडे यांनी अजिबात ऑपरेशन करायचे नाही असे निक्षून सांगितले.

गुडघ्याचे दुखणे कमी झाल्यावर मी प्रथमतः 200 मी धावण्यापासून सुरूवात केली आणि काही आठवड्यातच 1 किमी धावू लागलो. एक किमी धावल्यानंतर रक्ताभिसरण वाढल्यामुळे संपूर्ण रोमा-रोमात आणि अंगभर एक वेगळेच चैतन्य मी अनुभव केले. हाच प्रयत्न चालू ठेवून मी हळुहळु 5 किमी धावू लागलो. उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. पुढे नागपुरात बदली झाल्यावर मी आठवड्यातून एकदा सेमीनरी हिल्स हा 5.25 किमी चा ट्रेक कधी धावून आणि मधून मधून चालून पूर्ण करू लागलो. स्वतःलाच चॅलेंज करत हा वेळ कमी कमी होऊ लागलाआणि मागच्याच (2018) वर्षी मी प्रथमच 10 किमी अंबाझरीच्या बांधावर धावलो आणि ते पूर्ण केल्यावर मनस्वी आनंद झाला. याबाबतचा अनुभव आणि लागलेला वेळ माझा सहकारी अधिकारी मित्र जयंत जावडेकर आणि यामिनी यांचेशी share केला. जयंत नियमित मॅरेथॉन रनर आहे. त्याने तर माझी 10 किमी ला लागलेली वेळ बघून मी 21 किमी अंतर अडीच तासात सहज करू शकेन असे त्याच वेळी सांगितले आणि यामिनीने सुद्धा आता 21 किमी धावाच सर तुम्ही असा आग्रह केला. त्याच वर्षी मग नागपूर येथील आयुर्वेद दौड मध्ये मी 8 किमी ह्या पहिल्या लांब पल्याच्या शर्यतीत भाग घेतला आणि पूर्ण केली. तरीही लिगामेंट्स Injury मुळे मला 21 किमी अंतर माझ्या क्षमते पलीकडे आहे ही धारणा मनात घर करून बसली होती आणि ही शर्यत पूर्ण करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड आदर वाटायचा. त्यांच्या फेसबुक वरील success stories पाहून ही उत्सुकता आणि आदर आणिकच वृद्धिंगत व्हायचा. सातारहून नागपूरला बदलीमुळे आलेले भूमी अभिलेख अधिकारी श्री. भूषण मोहिते हे उत्कृष्ट मॅरेथॉन रनर आहेत त्यांनीही धावण्याबाबत महत्वपूर्ण टिप्स दिल्या. अलीकडेच माझा बालपणीचा मित्र अरविंद राजे याने 21 किमी पूर्ण केल्याची पोस्ट टाकली आणि आपणही प्रयत्न करायला हवा असे प्रकर्षाने वाटू लागले. मग अरविंदला आवर्जून फोन केला त्याने सुद्धा तुला जमेलच असा आत्मविश्वास दिला.

अशातच एक दिवशी आमच्या महापालिकेचे आयुक्त श्रीयुत अभिजित बांगर सर यांचा मला फोन आला ऑरेंज सिटी रनर्स असोसिएशन, नागपूर महापालिकेच्या आणि इतर पार्टनर्स यांचे सहकार्याने एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणार असून त्यात तुम्हाला भाग घ्यावयाचा आहे असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना अवश्य भाग घेणार सर आणि दहा किलोमीटर धावणार असे आश्वासन दिले. पण त्यांनी दहा किलोमीटर ऐवजी मी 21 किलोमीटरमध्ये भाग घ्यावाअशी अपेक्षा व्यक्त केली. ही अपेक्षा सुद्धा मला प्रेरणादायी ठरली.

ऑरेंज सिटी रनर्स यांनी मॅरेथॉन लॉंचिंगबाबत आयोजित केलेल्या समारंभाला मला महापालिकेच्यावतीने जाण्याचे योग आला त्यावेळी मी माझ्या धावण्याच्या अनुभवाचे त्याठिकाणी कथन केले. कार्यक्रम संपल्यानंतर एक प्रभावी व्यक्तिमत्वाची व्यक्ती माझ्याजवळ आली आणि त्यांनी तुम्ही थोडे ट्रेनिंग घेऊन 21 किलोमीटर अंतर सहज करू शकाल असा आत्मविश्वास मला दिला. त्यांचे नांव डॉक्टर नीना साहू. त्या अनुभवी फिजिओथेरपीस्ट आहेत. 21 किमी चा Mental Block निघाल्यावर सर्वसाधारण पणे सामान्य व्यक्ती ही रेस पूर्ण करू शकेल असे त्या ठासून सांगतात. नागपुरात ऑरेंज सिटी रनर्स असोसिएशनचे माध्यमातून धावपटू तयार करण्यात त्यांचे फारच मोठे योगदान आहे. त्यांनी मॅराथॉन मध्ये भाग घेण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस प्रशिक्षण आयोजित केले असून त्यात भाग घेण्याची सूचना केली. मी सेंट उरसूला शाळेचे प्रांगणात होणाऱ्या प्रशिक्षणाला आठवड्यातून तीन दिवस न चुकता जाऊ लागलो. याठिकाणी त्यांनी पायाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पायाचे मसल्स मजबूत व्हावेत म्हणून विविध प्रकारच्या एक्झरसाइज नावीन्यपूर्ण रीतीने आणि अतिशय मनोरंजक पणे ग्रुप अॅक्टिविटीचे माध्यमातून करवून घेतल्या. प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या पायाच्या स्नायूंची ताकद वाढत गेल्याचे मला जाणवले आणि त्यातूनच आत्मविश्वास वाढत गेला. तरीही 21 किलोमीटर मध्ये भाग घ्यावा किंवा कसे? याबाबत मन साशंक होते. अशातच एक डिसेंबर रोजी मेट्रो नागपूर यांनी आयोजित केलेल्या दहा किलो मीटर शर्यतीत मी भाग घेतला आणि चांगल्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली. त्यानंतर मात्र मी एकवीस किलोमीटरमध्ये भाग घेण्याचे निश्चित केले आणि त्याप्रमाणे ऑरेंज सिटी रनर्स यामध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केले.

ऑरेंज सिटी रनर्स असोसिएशनने 8 डिसेंबर 2019 च्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अतिशय उत्कृष्ट पणे करण्यात आले होते. छान वातावरण निर्मिती करून माहोल तयार केला होता. ठिक ठिकाणी ढोल-ताशे, झुम्बा डान्स, DJ, लेझीम गृप Cheer up करत होते. यासोबतच आवश्यक असे पाणी, संत्री, एलेक्ट्रल पावडर, चिक्की, केळी आदी ठराविक अंतरावर उपलब्ध करून देण्यात येत होते. आयोजकांचे स्वयंसेवक उभे राहून उत्साह वाढवत होते. बोहरा मुसलमान समाजाचे बांधव चौका चौकात ट्रॅफिक पासून रनर्सचे रक्षण करतांना दिसत होते. अगदी कुणाच्या पायाला Cramp आल्यास त्यासाठी तत्काळ relief देणारा स्प्रे सुद्धा उपलब्ध होता.

शेवटचे 4 किमी अंतर मात्र पायात Cramp येण्याची लक्षणे जाणवू लागल्याने अगदी हळू गतीने अधून मधून पोटरीच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग करून पूर्ण केली.

सरते शेवटी Finish Line पार केल्यावर मात्र एक सुप्त ईच्छा पूर्ण केल्याचा वेगळाच आनंद मनात भरून गेला होता. मी शर्यत 2 तास 34 मिनिटात पूर्ण केली. (जयंतनी सांगितलेल्या वेळेपेक्षा फक्त 4 मिन जास्त.)

हे सुप्त मनातले स्वप्न पूर्ण करण्यास उत्तेजन देणारी माझी ट्रेक फ्रेंड यामिनी, माझा सहकारी मित्र जयंत, बालमित्र अरविंद, श्री.भूषण मोहितेआणि मॅरेथॉन धावण्यास माझे शरीर आणि मन तयार करणारे डॉ.नीना साहू त्यांची टीम आणि अर्थात माझा उत्साह वाढविणारे माझे संपूर्ण कुटुंब आणि फिटनेसच्या प्रवासात माझ्या प्रयत्नांचे कौतुक करणारी माझी मित्र मंडळी यांचा मी शतशः ऋणी आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी धावण्याच्या बाबत शून्यापासून सुरू करून, दुखापतीवर मात करून 55 व्या वर्षी अर्ध मॅरेथॉन धावण्याचे उद्दिष्ट गाठणे, हा माझा अनुभव आजच्या तरुणाईला आणि पायाच्या अथवा शारीरिक Injury असलेल्या व्यक्तींना प्रेरणादायी ठरेल अशी मला आशा आहे.

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कितीही busy असलो, तरीही फिटनेससाठी स्वतःकरिता वेळ काढता आला पाहिजे अस मला वाटत. छोटे छोटे उद्दिष्ट निश्चित करून आणि ते पूर्ण करण्याकरिता कुणाशीही स्पर्धा न करता, स्वतःलाच चॅलेंज करून साध्य करून घेता आले पाहिजे.

जीवन सुंदर आहे..! त्याचा आस्वाद घेण्यासाठी शरीर तंदुरुस्तच असावे यासाठी प्रत्येकाने निश्चय करावा हाच या अनुभव कथनाचा एक उद्देश आहे.

राजेश मनोहर मोहिते
लक्ष्मी नगर, नागपूर
9420084600