नागपूर : राज्याची उपराजधानी असेलल्या नागपुरात पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाझरी तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. जलपर्णी म्हणजे इकाॅर्निया या वनस्पतीने तलावाला विळखा घातल्याने तलाव अक्षरश: नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
नागपूर महानगर पालिकेने ‘जलपर्णी’ग्रसित जलकुंभ साफ केल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा खोटा असून ‘नागपूर टुडे’ने यावर प्रकाश टाकला. तसेच यासंदर्भात पर्यावरण अभ्यासकांशीही चर्चा केली.
जलपर्णीची तलावात होते झपाट्याने वाढ –
जलपर्णी वनस्पतीची तलावात झपाट्याने वाढ होते. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करू शकते. त्या बियांचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.
ती पाण्यावर तरंगणारी असल्याने तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि नियंत्रण करणे कठीण जाते. पसरट पानांमुळे ही वनस्पती वातावरणातील ऑक्सिजन तलावाच्या तळापर्यंत पाेहचू देत नाही. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसे ऑक्सिजन मिळणे थांबते आणि मासे मरायला लागतात.इतके नाही तर तलावातील इतर सजीव, वनस्पती व जैवविविधता नष्ट हाेते.
ऑक्सिजन घटल्याने पाण्याचा गढूळपणा वाढताे आणि पाणी प्रदूषित होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुर महानगर पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.