Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Oct 31st, 2019

  ११५०६ खड्डे मनपाने बुजविले

  नागरिकांना दिलासा : ऑनलाईन तक्रारींचीही गांभीर्याने घेतली जातेय दखल

  नागपूर : पावसामुळे नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्याची मोहिमच मनपातर्फे हाती घेण्यात आली आहे. १ एप्रिल ते २४ ऑक्टोबर दरम्यान मनपाने सुमारे ११५०६ खड्डे बुजविले आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात असलेल्या तक्रारी करणे सोयीचे व्हावे यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर आलेल्या तक्रारींचेही तातडीने निरसन करण्यात येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

  नागपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी रस्तेच्या रस्ते उखडले आहेत. दहाही झोनअंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित झोनच्या लोककर्म विभागाने मोहिमच हाती घेतली आहे. याअंतर्गत १ एप्रिल ते २४ ऑक्टोबर दरम्यान ८९६० लहान-मोठे खड्डे बुजविण्यात आले. सुमारे २५९६५७.१३ वर्ग मीटरच्या क्षेत्रफळावरील हे खड्डे होते. तर सुमारे २५४६ खड्डे जेट ‌पॅचरने बुजविण्यात आले आहेत. सुमारे ३२९३६.९२ वर्ग मीटर क्षेत्रफळात हे खड्डे होते. असे एकूण ११५०६ खड्डे सहा महिन्याच्या कालावधीत बुजविण्यात आले. १ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत ७३२५०.८ वर्गमीटरवरील सुमारे २९४२ खड्डे बुजविण्यात आले. तर २० सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत जेट पॅचर मशीनने बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची संख्या ४५४ इतकी आहे.

  खड्डे बुजविण्यात आलेले महत्त्वाचे मार्ग
  यामध्ये आकाशवाणी चौक ते काटोल नाका मार्गातील ३३, क्रीडा संकुल ते पागलखाना चौक मार्गावरील १३, मोक्षधाम ते बसस्टॉप मार्गातील २३, मानस चौक ते कॉटन मार्केट ४३, भांडेवाडी ते बिदामल मार्गातील ४५, धंतोली लोखंडी पुलाजवळील १४, खामला परिसरातील १७, जयप्रकाश नगर परिसरातील २५, व्हिसीए चौक ते हायकोर्ट मार्गातील १२, वाठोडा रिंगरोड ते चांदमारी मार्गातील २१, मेयो हॉस्पीटल परिसरातील १७, बस स्टॉप ते डालडा कंपनी मार्गातील २४, मोठा ताजबाग परिसरातील ४०, नंदनवन सिमेंट रोड ते जगनाडे चौक मार्गावरील ८१, मेहंदीबाग सिमरन हॉस्पीटल मार्गावरील २०, अजनी परिसरातील ८१, इंदोरा चौकातील ४१, प्रतापनगर चौकातील २५, उच्च न्यायालय ते जपानी गार्डन मार्गावरील १८, कॉफी हाऊस चौकातील २०, मानकापूर फरस ते गोधनी रोड मार्गावरील २३, तुकडोजी पुतळा ते वंजारीनगर मागारवरील ४३, एलएडी चौकातील ३०, एलएडी चौक ते जपानी गार्डन मार्गावरील ४०, तपोवन, गोविंदनगर परिसरातील ३६ अशी खड्डे बुजविलेल्या काही महत्त्वाच्या मार्गाची नावे आहेत.

  ऑनलाईन तक्रारींची तातडीने दखल
  नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी मनपाकडे करणे सोयीचे व्हावे यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. स्वतंत्र खड्डे तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून ह्या सेलमार्फत ई-मेल, फेसबुक, ट्विटर वर आलेल्या तक्रारी संबंधित झोनकडे पाठवून त्याची माहिती दिली जाते. दोन ते तीन दिवसांच्या आत ह्या तक्रारींचे निरसन केले जाते. तक्रारकर्त्यांना फोटोसह याबाबतची माहिती कळविली जाते. नागपूर मनपाने उपलब्ध करून दिलेल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत अडीचशेवर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १५० वर तक्रारींचे निरसन करण्यात आलेले आहे.

  खड्ड्यांची माहिती द्या : आयुक्त
  नागपूर शहरात पावसामुळे रस्ते खराब झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांसंदर्भातील माहिती मनपाच्या अधिकृत फेसबुक पेज किंवा ट्विटरवर नागरिकांनी द्यावी अथवा [email protected] या ई-मेलच्या माध्यमातून द्यावी. माहिती देताना तक्रारकर्त्याने आपले नाव, मोबाईल क्रमांक व लोकेशन अवश्य नोंदवावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145