नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण १५.५२ कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे.
२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून १० कोटी २७ लाख ३४ हजार ८५४ रुपयांची संपत्ती होती. तर २०२४ मध्ये हा आकडा १५ कोटी ५२ लाख ६० हजार ४६ इतका झाला. शपथपत्रातील माहितीनुसार गडकरी व त्यांच्या पत्नीकडे २०१९ साली १ कोटी ६१ लाख ३७ हजार ८५१ रुपयांची चल संपत्ती होती. २०२४ मध्ये हा आकडा २ कोटी ५७ लाख ७७ हजार ४६ इतका झाला आहे. यात २७ हजार ५० रुपयांची रोकड, ६५ लाख १० हजार ३०० रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, ३८ लाख ५० हजार ३९६ हजार रुपयांची गुंतवणूक, ४५ लाख ९४ हजार ८४३ रुपयांची वाहने तर ५६ लाख १ हजार ७५७ रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
२०१९ ते २०२४ या कालावधीत गडकरी व त्यांच्या पत्नीच्या नावे कुठलीही नवीन अचल संपत्तीची खरेदी झालेली नाही. २०१९ साली त्यांच्याकडे ८ कोटी ६५ लाख ९७ हजार रुपये मूल्याची अचल संपत्ती होती. आता त्याचे मूल्यांकन १२ कोटी ९४ लाख ८३ हजार इतके आहे. अचल संपत्तीमध्ये १ कोटी ५७ लाख ४१ हजारांची धापेवाडा येथे १५ एकर शेतजमीन, वरळी येथील ४ कोटी ९५ लाख चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडा येथील १ कोटी २८ लाख ३२ हजारांचे वडिलोपार्जित घर, उपाध्ये मार्ग येथील ५ कोटी १४ लाखांचे घर यांचा समावेश आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे १ कोटी ३२ लाख ९० हजारांची चल संपत्ती व ४ कोटी ९५ लाखांची अचल संपत्ती आहे.
२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे एकूण सहा कार होत्या व त्यांचे तत्कालिन मूल्य ४६ लाख ७६ हजार इतके होते. आता गडकरी दांपत्याकडे सहा वाहने असून त्यांचे मूल्य ४५ लाख ९४ हजार इतके आहे.
२०१९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी दोन कार खरेदी केल्या. २०१९ साली गडकरी दांपत्यावर १ कोटी ६२ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज होते. पाच वर्षांत कर्जाचा आकडा वाढून २ कोटी ४ लाख ९१ हजार १४० वर पोहोचला आहे. २०१७-१८ साली गडकरी दांपत्याचे वार्षिक उत्पन्न ४५ लाख ८३ हजार रुपये होते. २०२२-२३ मध्ये त्यात १८.८४ टक्क्यांची वाढ होऊन तो आकडा ५४ लाख ४६ हजार ९० इतका झाला आहे.
दरम्यान, गडकरी यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा न्यायालयीन खटले सुरू आहेत. पाच वर्षांत सात मानद पदव्या दरम्यान, गडकरी यांना २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत सात मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात चार डी.लिट, एक पीएचडी व दोन डीएस्सी पदव्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यासाठी या पदव्या त्यांना देण्यात आल्या. गडकरी यांचे शिक्षण बीकॉम व एलएलबी झाले आहे.