Published On : Thu, Apr 4th, 2024

नागपुरात नितीन गडकरींकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर; काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

Advertisement

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यानंतर त्यांनी प्रचार कार्यक्रमांना सुरुवात केली. मात्र गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे याची तातडीने दखल घेऊन गडकरींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका”, परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर गडकरी यांना नागपूरच्या गल्लीबोळात फिरावे लागत असल्याचा घाणघातही लोंढे यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे नियम आहेत. . १ एप्रिल २०२४ रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. शाळकरी मुलांचा राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या प्राचार्यांनाही निलंबित करावे.

राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे, याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही लोंढे आपल्या तक्रारीत म्हणाले आहे.