Published On : Mon, Aug 19th, 2019

प्राचिन संत साहित्य, ग्रंथसंपदेचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटलायजेशन आवश्यक- नितीन गडकरी

Advertisement

डॉ. मधुकर रामदास जोशी यांना यंदाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान

नागपूर : प्राचिन इतिहास, संस्कृती वारसा आणि संतांची सांस्कृतिक मुल्याधिष्ठित विचारधारा ही महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. जुने संत साहित्य, त्यांचे निरुपण, भावार्थ नवीन पिढीसाठी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथसंपदेला डिजीटलायजेशन सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सांस्कृतिक संचालनालयातर्फे ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ साहित्य संशोधक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव शैलेश जाधव, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. गुरूप्रसाद पाठमोडे यावेळी उपस्थित होते.

संत साहित्य व संस्कृतीबद्दल बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील संत श्री ज्ञानेश्वर, श्री नामदेव, श्री तुकाराम, श्री तुकडोजी महाराज, श्री गाडगेबाबा, श्री गुलाबराव महाराज हे केवळ संतच नव्हते तर खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. समाजामध्ये सुसंस्कृती व मुल्याधिष्ठित विचारसरणी जपण्यासाठी त्यांनी समाजाला मोलाची शिकवण दिली. या संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व साहित्यिक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील संत साहित्याला केवळ देशातच नाहीतर जगात मान्यता मिळवून देण्यासाठी संतांनी संग्रहीत केलेले प्रेरणादायी कार्य जगापुढे येण गरजेचे आहे. जुने संत साहित्य, ग्रंथसंपदा नवीन पिढीला उपलब्ध व्हावे तसेच या ग्रंथसंपदेचे जतन व्हावे यासाठी नवीन आयटी तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सत्कारमुर्ती डॉ. मधुकर रामदास जोशी म्हणाले, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझाच नाहीतर संत साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचा सन्मान असल्याचे मी मानतो. विदर्भ ही सारस्वतांची भूमी आहे. या पवित्र भूमीत महानुभाव पंथाचा विकास झाला. दत्त संप्रदाय देखील येथे उदयास आला. रामदासी व महानुभाव पंथाची शब्दरचना अवलौकीक आणि विस्मयकारी आहे. सुफी संप्रदायाचे महत्वदेखील विलक्षण आहे. या सर्वांच्या माध्यमातून समाजाला मुल्याधिष्ठित विचारसरणी रुजविण्याचे काम केल्या गेले आहे. प्राचिन हस्तलिखीतांचे शोध घेण्यासाठी मी तामिलनाडू, आंध्रप्रदेशापर्यंत गेलो. संत साहित्याची ग्रंथसंपदा महाराष्ट्रात विपूल प्रमाणात आहे. सर्व संतांनी मानवतेचा मंत्र जगाला दिला आहे. यासाठी सामान्य नागरिकाला समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये संतांनी जीवनाचे सार सांगितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्य संशोधक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र तसेच विठ्ठलाची मुर्ती देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांचा शुभेच्छा संदेश दाखविण्यात आला. पंढरपूरचे वारकरी दत्तात्र्य बडवे यांनी डॉ. मधुकर जोशी यांना खास पंढरपुरी बुक्का लावून अभिनंदन केले.

सुप्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे, शरयू दाते, गुणवंत घटवाई, सोनाली दिक्षीत या गायकांनी भक्तीरंग संगीतमय कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी केले. संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी तर आभार श्रीराम पांडे यांनी मानले.

डॉ. मधुकर रामदास जोशी हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहे. मराठी आणि संस्कृत या दोन भाषांमध्ये पदव्युत्तर आणि नाथ संप्रदायाच्या संशोधनार्थ आचार्य उपाधी त्यांनी प्राप्त केली आहे. ‘नाथ संप्रदाय’, ‘श्री दत्तगुरूचे दोन अवतार’, ‘मनोहर अंबानगरी’, ‘ज्ञानेश्वर चरित्र संशोधन’, ‘ज्ञानेश्वरी संशोधन’, ‘श्री विठ्ठल आणि पंढरपूर’, ‘गुरूचरित्र’ आदी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहे. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन देखील केले आहे.

Advertisement
Advertisement