Published On : Sat, Jun 1st, 2019

नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये जंगी सत्कार

Advertisement

नागपूर : केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये जंगी सत्कार करण्यात आला. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. तसंच त्यांच्याकडे पुन्हा एकदा केंद्रीय दळणवळण खात्याचा भार सोपवण्यात आलाय..त्यामुळे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक नितीन मुकेश यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.कृपाल तुमाने, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, आ.नागो गाणार, आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.परिणय फुके, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायक नितीन मुकेश यांच्या सुरेल स्वरांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. येता काळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी सुवर्णकाळ बनले.

खुद्द नितीन गडकरी यांना उद्योगांची जाण असून त्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना असतात. गडकरी यांच्या विजयात कार्यकर्त्यांचा मौलिक वाटा आहे. कार्यकर्ते हेच खरे सैनिक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. नागपूरमध्ये नितीन गडकरी जेव्हा उभे राहिले होते, तेव्हाच आमच्यासाठी विजय स्पष्ट होता. काही लोकांनी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नितीन गडकरी यांनी देशात तर काम केलेच, मात्र नागपूरचा चेहरामोहरादेखील बदलला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच नागपूर आंतरराष्ट्रीय शहर झाले. सर्व धर्म, पंथ, भाषेच्या लोकांना त्यांनी एकत्र घेऊन नेतृत्व दिले. त्यामुळेच नागपूर त्यांच्या पाठीशी उभे राहिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री व गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले. रेणुका देशकर यांनी संचालन केले.

कार्यकर्ते माझ्यासाठी परिवारच : गडकरी

यावेळी गडकरी यांनी छोटेखानी भाषणात कार्यकर्त्यांचे आभार मानले. कार्यकर्ता हा माझ्यासाठी परिवारातीलच एक भाग आहे. कार्यकर्ता हा परिवारातला आहे हे समजून त्याच्या सुखदु:खात सहभागी झाले पाहिजे. माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे साकार झाला. आभार मानणे हा शब्द औपचारिक होईल, मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो, या शब्दांत गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नितीन मुकेश यांच्या स्वरधारांत भिजले नागपूरकर

शनिवारी सायंकाळी शहरात पाऊस येऊन गेल्यानंतर वातावरण आल्हाददायक झाले होते. अशा सायंकाळी नितीन मुकेश यांच्या सुमधूर स्वरांच्या वर्षावात नागपूरकर चिंब भिजले. भाजपा व खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे सत्कार कार्यक्रमाअगोदर त्यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मुकेश यांनी स्वत: गायलेल्या गाण्यांसोबतच त्यांचे वडील पार्श्वगायक मुकेश यांच्या गाण्यांचे सादरीकरण केले. नितीन गडकरी यांनी तर सहकुटुंब कार्यक्रमाचा पूर्णवेळ आस्वाद घेतला. ‘मुबारक हो सबको, समां ये सुहाना’ या गाण्याने स्वरमैफिलीची सुरवात झाली. त्यानंतर ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी’, ‘जो तुमको हो पसंद’, ‘मेरा जूता है जपानी’ या गाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘जिस गली में तेरा घर’ ‘जाने कहां गए वो दिन’, ‘दुनिया बनाने वाले’ या गाण्यानी तर खुद्द मुकेशच अवतरल्याचा भास झाला. नितीन मुकेश यांनी ‘सो गया ये जहॉं’ हे गाणे गायला सुरु केले आणि संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ‘हम उस देश के वासी हैं’, ‘कभी कभी मेरे दिल में..’, ‘जीना यहॉ, मरना यहॉं’ या गाण्यांना मुख्यमंत्र्यांनीदेखील मोकळेपणाने दाद दिली. नितीन मुकेश यांनी परत नागपुरात यावे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हा कार्यक्रम संपूच नये, जुन्या काळातील सर्व सुमधूर गाण्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. मी मराठीच असल्याचे म्हणत नितीन मुकेश यांनीदेखील परत येण्याचा शब्द दिला. मानसी दातार परांजपे यांनीदेखील यावेळी गायनात सहभाग घेतला. सचिन तावड़े, सुरेश दळवी, विजय देशमुख, सुनील शेटे, राजन गायकवाड़, प्रवीण कोहली, यश भंडारे यांनी साथसंगत केली.