Published On : Thu, Sep 27th, 2018

गडकरींच्या गावात भाजपचा धुव्वा

BJP

Representational Pic

कॉंग्रेसचा 180 ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचा दावा
भाजपचा 382 पैकी 218 ग्रामपंचायतींवर दावा

नागपूर: जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींपैकी 218 जागांवर भाजपने दावा दावा केला असला तरीही केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) व खासदार दत्तक ग्राम योजनेतील पाचगाव (ता. उमरेड) तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मौदा तालुक्‍यातील कवठा (म्हासला) या मूळ गावी कॉंग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत.

गडकरी यांचे गाव असलेल्या धापेवाड्यात कॉंग्रेस समर्थित सरपंचासह सर्व 17 उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदाचे उमेदवार सुरेश मारुती डोंगरे यांनी 1750 मतांनी विजय मिळविला. येथील निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजीव पोद्दार, गडकरींचे समर्थक व जि. प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्यावर होती.

तर सावनेरचे आमदार सुनील केदार व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी कॉंग्रेस समर्थित उमेदवारांचा प्रचार केला. या निवडणुकीत आमदार केदार यांनी गडकरी यांना गावातच चित केल्याचे स्पष्ट झाले. विजयानंतर आमदार केदार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्‍वासनांचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. नागरिकांमधील असंतोष मतदानातून व्यक्त झाल्याचे ते म्हणाले.

उमरेड तालुक्‍यातील पाचगाव येथे सरपंचपदी कॉंग्रेस समर्थित उषा गंगाधर ठाकरे यांचा विजय झाला. येथे कॉंग्रेस समर्थित 10 तर भाजप समर्थित एक उमेदवार निवडून आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे दत्तक गाव असलेल्या मौदा तालुक्‍यातील कवठा (म्हासला) येथे सरपंचपदी कॉंग्रेस समर्थित अनिता आहाके 750 मतांनी विजयी झाल्या. येथे 11 पैकी 7 जागांवर कॉंग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत. सावनेर मतदारसंघात कॉंग्रेस, काटोल तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस नरखेड तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत. हिंगणा तालुक्‍यात भाजप समर्थित 21 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित 18 सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

बॉक्‍स
कॉंग्रेसचा 180 जागांवर दावा
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 218 जागांवर विजय मिळविल्याचे पत्रक जारी केले आहे. तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी 180 जागा कॉंग्रेस समर्थित उमेदवारांनी जिंकल्याचा दावा केला आहे.