नागपूर: शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री सुनील लहाने, उपायुक्त, सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव श्री संदीप जोशी, माजी महापौर श्रीमती मायाताई इवनाते, माजी नगरसेवक सर्वश्री जितेंद्र (बंटी) कुकडे, संदीप जाधव, वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह पोलीस विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, विद्युत विभाग, सिंचन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत जाहिर केली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहरातील नुकसानग्रस्त भाग, बाधित घरे आदींची सविस्तर माहिती यावेळी सादर केली. पूर परिस्थितीनंतर बाधित घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाले असून ते काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ सर्व परिसरात स्वच्छता राखली जावी यासाठी राज्य सरकार गाळ काढण्याकरिता निधी देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांची क्षती झाली. नाल्याजवळच्या भींती पडल्या, घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रूपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांची क्षती झाली, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. पोलिस विभाग सुद्धा सज्ज आहे.
आज या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती, ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. सकाळपर्यंत ती सुरु करण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहिल्या तीन तासातच लोकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता आणि त्याचे कौतूक केले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मदत सुपूर्द
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात, दुकानात पाणी शिरले. घरे उद्ध्वस्त झाली. अशात हजारी पहाड येथील श्री. योगेश वराडकर यांनी कर्ज घेऊन घेतलेल्या 14 जनावरे गोठ्यात बांधून होत्या. रात्री पावसाच्या पाण्यात बुडाल्याने सर्व जनावरांचा मृत्यू झाला. यांना नाम फाउंडेशनच्यावतीने 1 लाख रुपयांची मदत करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री श्री.
नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशनची मदत बाधित व्यक्तीला मिळू शकली. धनादेश सुपूर्द करतेवेळी माजी महापौर श्रीमती मायाताई इवनाते व माजी नगरसेवक श्री संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.