Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 22nd, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  शुल्लक चुकांमुळे निष्पापांचे नाहक बळी

  Air Cooler Shock

  File Pic

  कुलरचा वापर करतांना घ्यावयाच्या सुरक्षेच्या सुचनांसोबतच महावितरणकडून वारंवार करण्यात आलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष आणि फ़ाजील आत्मविश्वासामुळे मागिल महिन्याभरात कुलरच्या शॉक लागून अनेक निष्पापांचे नाहक बळी गेले आहेत. एक लहानश्या चुकीमुळे जाणा-या या बळींची संख्या बघता कुलर वापरतांना आवश्यक ती खबरदारी घेतल्यास या निष्पाप जीवांना वाचविणे शक्य असल्याने अश्या अप्रिय घटना टाळण्यासाठी कुलर हाताळतांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

  दिवसेंदिवस वाढणारे तापमान बघता विदर्भात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कूलरचा वापर सुरु झाला आहे. त्यातच दरवर्षी कधी कुलरजवळ खेळतांना वीजेचा धक्का बसल्याने तर कधी टूल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुदैवी मॄत्यू झाल्याच्या घटना सातत्त्याने घडत असतात, यांसारखे अनेक अपघात उन्हाळयाच्या दिवसात होतात, ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्कीट ब्रेकर्स बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहजरित्या उपलब्ध असून वीजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडीत होऊन पुढिल अनर्थ टाळता येतो, घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी.

  मागिल दिड महिन्यात कुलरच्या शॉकने प्राणांकीत अपघात होऊन जीव गमाविणा-यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे, एक चिमुकली तर अवघ्या 13 महिन्यांची आहे. धामणगाव येथील 28 वर्षीय उज्वल व्यवहारे या युवकाचा चालू कुलरमध्ये पाणी भरतांना, तर चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथील 35 वर्षीय प्रिती नखाते या महिलेचा कूलरचा स्पर्श झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात 35 वर्षीय सविता बाडबुधे महिलेचा कुलर सुरु करतेवेळी शॉक लागून मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील 15 वर्षीय विवेक पवार या मुलाचाही कुलरमध्ये पाणी टाकतांना शॉक लागून मृत्यू झाला. नागपूरच्या बडकस चौक परिसरातील ऋषीकेश आमले या 18 वर्षीय युवकाचाही कुलरमध्ये पाणी भरतेवेळी मृत्यू झाला. याशिवाय बुलकशाह अंजूम मो. अजह परवीन या 30 वर्षीय महिलेचा घरातील फ़रशी पुसतांना कुलरचा स्पर्श झाल्याने तर रामटेक येथे अवघ्या 13 महिन्याच्या प्रियांशी सावरकर या चिमुकलीचा अंगणात खेळतांना चालू कुलरच्या स्पर्शाने जीव गेला. तर वर्धेत कुलरची ताटी ओली झाली नाही म्हणून पाहणी करतेवेळी कुलरचा शॉक लागून अंकीत तुळणकर या 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याशिवाय कुलरमुळे इतरही अनेक प्राणांकीत अपघात झाले आहेत.

  वरील सर्व प्राणांकीत अपघात बघता कुलरच्या लोखंडी बाहयभागात वीज पुरवठा येऊ नये याकरिता कुलरचा थेट जमीनी सोबत संपर्क येर्इल अशी व्यवस्था करावी. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे, कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बूडली नसल्याची खात्री करून घ्यावी, कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, कुलरची वायर सदैव तपासूण बघावी. फ़ायबर बाहयभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कुलरचा वापर प्राधान्याने करा. घरातील मुले व इतर सदस्य कुलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवण्यात यावा. असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

  कुलरमुळे होणा-या अपघातात सर्वाधिक प्रमाण हे लहान मुले आणि तरूणांचा असतो त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यस्ततेतून थोडासा वेळ आपण या उपाययोजनांकरिता दिला तर कुलरमुळे होणारे वीजेचे अपघात मोठया प्रमाणात टळू शकतात, त्यामुळे आजच या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत अप्रिय घटना टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145