Published On : Wed, Nov 20th, 2019

कचरा संकलनाची नवी यंत्रणा हळूहळू होतेय सुरळीत

आयुक्त घेताहेत दररोज आढावा : ओला आणि सुका कचऱ्याचे स्वतंत्र संकलन,

नागपूर: नागपूर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी दोन एजंसी नेमून १५ नोव्हेंबरपासून नव्या पद्धतीने कार्य सुरू केले आहे. यानुसार, नागपूरकरांना घरातूनच ओला आणि सुका कचरा दोन स्वतंत्र कचरा पेट्यांमधून स्वच्छतादूताला देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागपूरकरांनी आता ओला आणि सुका कचरा स्वतंत्र कचऱ्यापेट्यांतून देणे सुरू केले असून त्यानुसारच नव्या कचरागाड्यांमधून तो स्वतंत्रपणे नेला जात आहे. नव्या यंत्रणेने कार्य हाती घेतले असले तरी आता हळूहळू कचरा संकलनाचे कार्य नियमित होणे सुरू झाले आहे.

नागपूर शहरात दोन पाच-पाच झोनमध्ये अनुक्रमे ए.जी. एन्व्हायरो आणि बीव्हीजी या एजन्सी कचरा संकलनाचे कार्य करीत आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या गाड्यांच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे या गाड्यांच्या माध्यमातून उचलला जात आहे. दोन्ही एजंसीजचे कार्य सुरू होण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना निर्मितीस्थळावरच कचरा विलग करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृतीचे कार्य आजही सुरू आहे. यासोबतच रस्त्यावर कचरा संकलन केंद्र बंद करून २५ ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती केली. त्यामुळे घराघरांतून एकत्रित केलेला कचरा संकलन केंद्रावरील कंटेनरमध्ये न टाकता सरळ मोठ्या वाहनांमध्ये टाकले जाते. ज्यातून हा कचरा सरळ प्रक्रियेसाठी भांडेवाडी डम्पिंग यार्डवर नेण्यात येतो. कचरा निर्मितीस्थळावरूनच विलग होत असल्याने कचऱ्यावरील पुढील प्रक्रिया करणे आता सोपे झाले आहे. कचरा संकलन केंद्रच संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी कचरा फेकणेही आता बंद झाले आहे. अशा केंद्रावरील कंटेनरही हटविण्यात आले आहे.

शहरातील बाजारांमधील व्यापाऱ्यांनाही रस्त्यावर कचरा फेकू नये, तो विलग स्वरूपात कचरापेट्यांतूनच देण्याचे आवाहनही नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार व्यापारीही आता कचरा स्वतंत्र कचऱ्यापेट्यांमध्ये विलग करून ठेवत आहेत. पूर्वी बाजारातील कचरा सकाळी उचलला जायचा. आता मात्र रात्र पाळीतूनही कचरा उचलण्याचे कार्य सुरू असल्याने सकाळी फिरणाऱ्या व्यक्तींना ‘स्वच्छ नागपूर’चा अनुभव येत आहे. हॉटेलमधील शिळे अन्न व अन्य कचराही विलग स्वरूपातच मिळत असल्याने त्याची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे.

आयुक्तांचा आढावा, अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे
नवी यंत्रणा पूर्णपणे सुरळीत होईस्तोवर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि आरोग्य विभगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत: यंत्रणेकडून होत असलेल्या कार्यावर जातीने लक्ष ठेवावे, पूर्णपणे कचऱ्याची उचल व्हावी याची काळजी घेण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. आयुक्त स्वत: दररोज सकाळी झोननिहाय दौरा करीत असून यंत्रणेचा आढावा घेत आहेत. आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी (ता. १९) मंगळवारी झोनचा दौरा केला. व्यवस्थेची आणि कार्याची पाहणी केली. आयुक्त स्वत: दररोज आढावा घेत असून एका एजंसीकडून दुसऱ्या एजंसीला कार्य सोपविल्यामुळे ते नियमित व्हायला काही दिवस लागतील. परंतु आता हळूहळू सर्व सुरळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा मानले नागपूरकरांचे आभार
नागपूर शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा दिवसरात्र प्रयत्नरत आहे. यासाठी नागपूरकरांनी आपली जबाबदारी ओळखून यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे वारंवार करण्यात येते. मनपाच्या आवाहनाला नागपूरकर सकारात्मक प्रतिसाद देत असून त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नागपूरकरांचे आभार मानले आहे. असाच लोकसहभाग राहिला तर येत्या काही दिवसात नागपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत आणि कचऱ्यावरील प्रक्रियेच्या बाबतीत अव्वल स्थानावर असेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

टोल-फ्री क्रमांकावर करा कॉल

शहरात कुठेही कचरा आढळत असेल किंवा घरातून कचरा उचलला गेला नसेल तर नागरिकांना टोल-फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. झोन क्रमांक १ ते ५ (लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर)साठी १८००२६७७९६६ हा तर झोन क्रमांक ६ ते १० (गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर, मंगळवारी)साठी १८६०२६६२९९० हा टोल-फ्री क्रमांकसुद्धा आज नागपूर महानगरपालिकेने जारी केला आहे.