Published On : Thu, Jun 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयच्या अद्यावतीकरणाचे नवे धोरण महत्त्वाचे

खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी विश्वासाने पुढे येण्याचे आवाहन
Advertisement

नागपूर, : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत तंत्रकुशल युवा मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ज्या गतीने औद्योगिकीकरणाच्या गरजा बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सौरऊर्जेपासून इलेक्ट्रीक वाहनापर्यंत उत्पादने वाढली आहेत. यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने नुकतेच धोरण जाहीर केले असून यात कंपन्यांच्या सहभागातून त्यांना गरजेनुरूप कौशल्य असलेली युवा पिढी घडविता येईल, असा विश्वास राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक – खाजगी भागिदारीद्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अद्यावतीकरणाबाबत सिव्हील लाईन्स येथील चिटणविस पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, ॲडव्हांटेज विदर्भचे प्रेसिडेंट आशिष काळे, सहसंचालक योगेश पाटील, निखिल मुंडले, मीत्राचे समन्वयक विनयकुमार सोटे व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यात महाराष्ट्र शासनाचे जवळपास 418 औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत. याचबरोबर खाजगी क्षेत्रातील सहाशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या संस्थांमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीप्रमाणे, गरजेप्रमाणे करावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. ज्या काही त्रुटी आहेत त्या शासनाने समजून घेतल्या असून त्यावर मात करण्यासाठी आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगी भागेदारीद्वारे अद्यावतीकरणाचे धोरण स्विकारले आहे. या धोरणाप्रमाणे आम्ही खाजगी उद्योग क्षेत्रांसोबत काम करण्यास उत्सुक असून कंपन्यांनी विश्वासाने पुढे यावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

आपल्या आयटीआय संस्थांचे जागतिकदर्जाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये रुपांतर करण्याचा उद्देश आपण या धोरणापाठीमागे निश्चित केला आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी या विभागाच्या सहभागातून सदर धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून विदर्भात मोठ्या प्रमाणात नविन उद्योग येत आहेत. मोठी गुंतवणूक उद्योजक विदर्भात करत आहे. यातून साकारणाऱ्या उद्योग क्षेत्राला अपेक्षित असणारे तंत्रकुशल मनुष्यबळ शासनाच्या या नव्या धोरणातून निर्माण होईल अशी अपेक्षा ॲडव्हांटेज विदर्भचे चेअरमन किरण काळे यांनी व्यक्त केली.


मानवी कौशल्याची गुंतवणूक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला पर्याय नसून त्यासाठीच शासनाने हे नवे धोरण आणले आहे. सर्वांनी एकत्र येवून आपण प्रयत्न केले तर कुशल मनुष्यबळाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल असे कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात विदर्भातील उद्योजकांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी संवाद साधला.

यावेळी औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. सहसंचालक किरण मोटघरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement